एसटी डेपो रोहा तसेच रोहा चर्च संयुक्त विद्यमाने वृक्षारोपण कार्यक्रम उत्साहात संपन्न…

0
14

रायगड शिवसत्ता टाइम्स (नरेश पाटील):-

जागतिक पर्यावरण दिनानिमित्त रोहा एसटी डेपो तसेच रोहा चर्च यांच्या संयुक्त विद्यमाने रोहा, रायगड येथे भव्य वृक्षारोपण कार्यक्रम उत्साहात पार पडला. या उपक्रमात विविध शासकीय विभाग व स्थानिक संघटनांनी उत्स्फूर्त सहभाग घेतला. यावेळी प्रांताधिकारी ज्ञानेश्वर खुटवल, वनसंरक्षक (DFO) डॉ. शैलेंद्र कुमार जाधव, तहसीलदार किशोर देशमुख, उपअभियंता वी.आर.बागुल, शाखा अभियंता ए. एम. पाटील, ज्युनियर शाखा अभियंता एम. एम.घाडगे, वनपाल डी. बी. वाघे हे मान्यवर उपस्थित होते. तसेच रोहा आगार व्यवस्थापक प्रकाश शेलार, स्थानक प्रमुख अजिंक्य रोहेकर, आगार लेखापाल विकास खाडे, वरिष्ठ लिपिक प्रियांका चव्हाण, वाहतूक नियंत्रक हेमंत कदम, सहाय्यक कार्यशाळा अधीक्षक स्वप्नील पवार, वाहतूक नियंत्रक नेथू गावित, आणि वाहतूक नियंत्रक छाया घोरपडे यांचीही प्रमुख उपस्थिती होती. डेपोचे कर्मचारी व उन्हाळी शिबिरातील लहान मुलांनीही आनंदाने सहभाग घेतला.

एसटी डेपो परिसरात व आजूबाजूला अनेक रोपे लावण्यात आली. यंदाच्या जागतिक पर्यावरण दिनाचे घोषवाक्य “आपली भूमी, आपले भविष्य” या संकल्पनेवर आधारित होते, ज्यामध्ये भूमी पुनरुज्जीवन, वाळवंटीकरण आणि दुष्काळ प्रतिकारशक्ती यावर भर देण्यात आला.

या उपक्रमाचे उपस्थित अधिकारी व मान्यवरांनी कौतुक केले आणि अशा उपक्रमांमध्ये स्थानिक लोकसहभाग महत्त्वाचा असल्याचे सांगितले. प्रांताधिकारी ज्ञानेश्वर खुटवल म्हणाले, “सरकारी यंत्रणा व नागरिक समाज यांच्यातील अशा प्रकारच्या भागीदारीमुळे दीर्घकालीन व शाश्वत पर्यावरण संवर्धन शक्य होते.”

कार्यक्रमाची सुरुवात डेपो प्रशासनाने उपस्थित मान्यवरांचे रोपे देऊन स्वागत करून केली. त्यानंतर लहान मुलांनी स्वागत केले आणि आभार मानले. यानंतर प्रमुख मान्यवर व मुलांच्या हस्ते विविध प्रकारच्या रोपांचे वृक्षारोपण करण्यात आले. या आनंददायी क्षणी “झाडे लावा, झाडे जगवा” या घोषणा परिसरात गुंजल्या.

कार्यक्रमाच्या शेवटी सर्व मान्यवरांना व मुलांना डेपोच्या प्रशासकीय कार्यालयात आमंत्रित करण्यात आले, जिथे प्रत्येकाचे गुलाब फुल देऊन स्वागत करण्यात आले. शेवटी रोहा चर्चचे प्रमुख फादर यांनी आभार प्रदर्शन केले. या दरम्यान स्नेहवर्धनी संस्थेचे पदाधीकारी ही उपस्थित होते. कार्यक्रमाचा समारोप उपस्थित लहान मुलांसाठी अल्पोपहार देऊन करण्यात आला.