पोस्को कंपनीत वैद्य संतोष गटणे यांचे पत्रकार व शेतकऱ्यांसाठी मार्गदर्शक व्याख्यान… 

0
30

माणगाव शिवसत्ता टाइम्स (नरेश पाटील):-

माणगाव तालुक्यातील विळे-भागाड औद्योगिक वसाहतीतील पोस्को महाराष्ट्र स्टील कंपनीच्या सामाजिक बांधिलकी उपक्रमांतर्गत, पत्रकार व शेतकऱ्यांसाठी त्रैमासिक मार्गदर्शन सत्र आयोजित करण्यात आले… शुक्रवारी सकाळी ११:३० वाजता सुरू झालेल्या या कार्यक्रमात पर्यावरणपूरक शेती, शेतीपूरक आयुर्वेद, पशुपालन यावर सखोल चर्चा झाली… यावेळी पुण्यातील प्रसिद्ध आयुर्वेद तज्ञ वैद्य संतोष गटणे यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले…

कार्यक्रमाची सुरुवात कंपनीचे कोरियन संचालक जी युन पार्क, विभाग प्रमुख महेंद्र तट्टे, राजू गाडुते, स्वप्निल पाटील, कुलदीप पुरंदरे आणि महिला प्रतिनिधी आरती म्हामुणकर यांच्या हस्ते दीप प्रज्वलनाने झाली…. वैद्य गटणे यांनी आपल्या व्याख्यानात रायगडातील वनऔषधींचे महत्त्व, पारंपरिक आहारपद्धतीचे फायदे व गाईचे दूध, गूळवेल, शतावरी यांसारख्या औषधी वनस्पतींचा उपयोग यावर सविस्तर माहिती दिली…  “आपल्या शेतीतील पिके व परिसरातील वनस्पतींचा योग्य उपयोग करून आपण आरोग्य सुधारू शकतो,” असे त्यांनी स्पष्ट केले… सध्याच्या काळातील वाढत्या आजारांचे मुख्य कारण हे बदललेली जीवनशैली व अपोषण असल्याचे त्यांनी सांगितले… त्याचबरोबर पशुपालन व पशुआयुर्वेद विषयावरही सविस्तर मार्गदर्शन करून गाई-म्हशींच्या आजारांवर गोमूत्र, गुळवेल, बहावा, लाजाळू यासारख्या वनस्पतींचा उपयोग करून कसे उपचार करता येतील, याची माहिती त्यांनी दिली… नाचणी, कुळीथ, तांदळाची पेज यांसारख्या पारंपरिक आहारातील घटकांचे आरोग्यासाठी महत्त्व त्यांनी अधोरेखित केले….

अंतर्गत शेतीच्या उत्पादनाची प्रक्रिया करून योग्य बाजारभाव मिळविण्यासाठी निरोगी जीवनशैलीसाठी स्थानिक अन्नपदार्थांचा वापर करण्याचा सल्ला वैद्य गटणे यांनी यावेळी दिला…. त्यांचे मार्गदर्शन ऐकून उपस्थितांनी समाधान व्यक्त करून, अशा उपक्रमांचे सातत्य हवे असल्याचे मत व्यक्त केले…