रायगड शिवसत्ता टाइम्स (वार्ताहर):-
रायगड जिल्ह्याचं राजकारण म्हटलं की अलिबाग नगरपरिषद नेहमीच चर्चेत राहिली आहे. आता निवडणुकीची घोषणा होताच सर्व पक्ष हलले आहेत. मात्र, सर्वांचं लक्ष एका प्रश्नावर केंद्रित झालंय शेतकरी कामगार पक्ष (शेकाप) अध्यक्षपदासाठी कोणत्या महिला चेहऱ्यावर विश्वास ठेवणार?यावेळी अध्यक्षपद “सर्वसाधारण महिला प्रवर्गासाठी” राखीव असल्याने शेकापसमोर योग्य, जनमान्य आणि प्रभावी महिला उमेदवार निवडण्याचं मोठं आव्हान उभं आहे.शेकापमध्ये सध्या मानसी म्हात्रे, अक्षया नाईक आणि सुप्रिया पाटील ही तीन नावं सर्वाधिक चर्चेत आहेत.मानसी म्हात्रे – अनुभवी, संघटनात खोलवर रुजलेली कार्यकर्ती.अक्षया नाईक – तरुण, शिक्षित, नव्या पिढीचं प्रतिनिधित्व करणारी. यांच्यामागे माजी नगराध्यक्ष प्रशांत नाईक यांचं बळ आहे.सुप्रिया पाटील – माजी आमदार जयंत पाटील यांच्या पत्नी आणि प्रशांत नाईक यांच्या भगिनी.दरम्यान, विरोधकांनीही तयारी सुरू केली आहे.राष्ट्रवादीकडून कविता ठाकूर,काँग्रेसकडून श्रद्धा ठाकूर,आणि वकील वैशाली बंगेरा या नावांची चर्चा आहे. स्थानिक वर्तुळात बोललं जातं की प्रवीण आणि कविता ठाकूर यांच्या निवडणुकीत प्रशांत ठाकूर यांनी मदत केली होती.त्यामुळे समीकरण अधिक गुंतागुंतीचं झालं आहे.शेकापच्या वरिष्ठ नेत्यांनी सर्व संभाव्य उमेदवारांवर सर्वेक्षण अहवाल मागवला असून, संघटनात्मक बळ, जनाधार आणि लोकांतील स्वीकारार्हता यावरच अंतिम निर्णय होणार आहे.अलिबागचं राजकारण मात्र केवळ पक्षीय नाही — नातेसंबंधही इथं तितकेच प्रभावी आहेत.माजी नगराध्यक्ष प्रशांत नाईक यांच्या कन्या अदिती नाईक या शिंदे गटाचे आमदार महेंद्र दळवी यांच्या सून आहेत. तर त्यांच्या दोन बहिणींपैकी एक जयंत पाटील यांच्या पत्नी, आणि दुसरी भाजपचे माजी आमदार सुभाष (पंडितशेठ) पाटील यांच्या पत्नी आहेत.म्हणजेच, एकीकडे सोयरिक शिंदे गटात, तर दुसरीकडे निष्ठा शेकापकडे अशा गुंतागुंतीच्या नातेसंबंधांच्या छायेत निवडणूक रंगणार आहे.म्हणूनच सध्या चर्चेचा केंद्रबिंदू ठरला आहे प्रश्न —अलिबागमध्ये नातं टिकवणार की राजकारण?या निवडणुकीचा निकाल फक्त नगरपरिषदेचा अध्यक्ष ठरवणार नाही, तर तो शेकापच्या भवितव्याचा आणि रायगडच्या पुढच्या दशकातील राजकीय समीकरणाचा आराखडा तयार करणार आहे.शिंदे गटाचे आमदार महेंद्र दळवी हे सोयरिक सांभाळतात की पक्षनिष्ठा? हाच प्रश्न आता अलिबागच्या राजकारणाला पेटवतो आहे.

