उरण आगारातील एसटी सेवेचा बोजवारा… एसटी बस सेवा ही प्रवाशांसाठी रोजची डोकेदुखी…

0
46

उरण शिवसत्ता टाईम्स (प्रविण पाटील):-

उरण डेपोतून एसटी सेवेचा बोजवारा उडाला असून  वेळापत्रक केवळ नावापुरते आहे…प्रशासनाकडून वेळेवर कुठल्याच बसेस सोडत  नाहीत.उरण एसटी आगाराचा कारभार बेजबाबदारपणाचा नमुना ठरत असून,उरण- पनवेल,पेण,कर्जत,आणि आवरे मार्गावरील एसटी बस सेवा ही प्रवाशांसाठी रोजची डोकेदुखी बनली आहे.अधिकृत वेळापत्रक असले तरी प्रत्यक्षात त्याचे पालन होत नाही. बस केव्हा येईल, केव्हा निघेल याचा नेम नसतो, त्यामुळे प्रवाशांची मोठी गैरसोय होते.या मार्गावर फक्त एकच बस सेवा सुरु असून, तीच बस पनवेलहून परत उरणकडे येते. मात्र निश्चित वेळ नसल्याने प्रवाशांना दीड-दोन तास बसची वाट बघावी लागते. परिणामी एकाच वेळी अनेक प्रवासी जमा होतात आणि बस आल्यावर गोंधळ,वादविवाद किंवा झटापटीच्या घटना घडतात.

उरण आगारात आधीच प्राथमिक सुविधा अत्यंत अपुऱ्या आहेत. स्वच्छता, आरामदायक बैठक व्यवस्था, वेळापत्रकाचे योग्य प्रदर्शन किंवा डिजिटल माहिती फलक यांचा अभाव आहे.यामुळे शालेय विद्यार्थी, महिला, कामगार, नोकरदार वर्गांचे हाल सुरूच आहेत. प्रवाशांनी वारंवार तक्रारी करूनही प्रशासनाने फारशी दखल घेतलेली नाही. अधिकारी फक्त लेखी उत्तर देऊन आपली जबाबदारी पार पाडल्याचे भासवतात.प्रवासी संघटनांनी स्पष्ट इशारा दिला आहे, जर वेळापत्रकाचे काटेकोर पालन झाले नाही आणि आगारात आवश्यक सुविधा उपलब्ध केल्या नाहीत, तर नागरिकांच्या नेतृत्वाखाली तीव्र आंदोलन छेडले जाईल.

तसेच चालक वाहक यांची मनमानी चालु असुन हात दाखवून सुध्दा बसेस  थांब्यावर थांबत नाहीत.यांच्यावर प्रशासनाने वचक ठेवून महसुल वाढविण्यासाठी प्रयत्न करणे आवश्यक आहे.