महाड शिवसत्ता टाइम्स (निलेश लोखंडे):-
शेतकऱ्यांना आधुनिक कृषी तंत्रज्ञानाची माहिती व्हावी यासाठी डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठ दापोली संलग्न श्री भैरवनाथ निसर्ग मंडळ संचलित कृषी महाविद्यालय मोहोप्रे- आचळोली (महाड) येथील कृषिदूतांनी कोळोसे गावात ग्रामीण कृषी जागरूकता कार्यानुभव कार्यक्रमांतर्गत शेतीसाठी फायदेशीर व घातक कीटकांची ओळख व माहिती करून दिली त्यामध्ये त्यांनी मधमाशी, चित्रांग, भुंगेरा, नाकतोडा, फुलपाखरे, रेशीम किडा, टोळ, वाळवी, घरमाशी, कसर अशा काही मित्र कीटक व शत्रू कीटक यांची चित्रांसहित शेतकऱ्यांना माहिती व ओळख करून दिली. या प्रात्यक्षिकामध्ये त्यांनी मित्र कीटक कशाप्रकारे कार्य करतात व ते आपल्याला उत्पन्न वाढवण्यासाठी कसे मदत करू शकतात हे पटवून दिले त्याचबरोबर शत्रू कीटक कशा प्रकारे नुकसानकारक ठरतात हे सविस्तर सांगितले. शत्रू कीटकांचे जैविक रासायनिक व यांत्रिक नियंत्रण करण्यासाठी उपाय सांगितले. हे प्रात्यक्षिक घेतेवेळी शेतकऱ्यांनी या कीटकांबद्दल असणाऱ्या समस्या मांडल्या व कृषिदूतांद्वारे त्यांचे निरसन करण्यात आले. कोळोसे गावातील शेतकरी नक्कीच या माहितीचा पुरेपूर वापर करतील व इतर शेतकऱ्यांनाही चांगल्या प्रकारे समजावून सांगतील. हे प्रात्यक्षिक घेते वेळेस कोळोसे गावचे ग्रामस्थ उपस्थित होते.
कृषी महाविद्यालय मोहोप्रे-आचळोलीचे प्राचार्य डॉ. व्ही. जे. गिम्हवणेकर, कार्यक्रम समन्वयक प्राध्यापिका व्ही.आर. पवार, कार्यक्रम अधिकारी प्राध्यापक एस. एस. सकपाळ,यांच्या मार्गदर्शनाखाली हे कृषिदूत कोळोसे गावामध्ये प्रात्यक्षिक राबवत आहेत. कृषि महाविद्यालय मोहोप्रे- आचळोली येथील कृषिदूतांमध्ये विपुल हगवणे, प्रतिक जाधव, युवराज सुर्यवंशी, गौरव विश्वकर्मा, मानव पाटील, रामचंद्र ठणके, रोहन चव्हाण, समीर न्हावेलकर यांचा समावेश आहे.