खांदाड गावात सलग तिसऱ्या वर्षी तलावात मगर दिसल्याची घटना – ग्रामस्थांमध्ये चिंतेचं वातावरण…

0
5

माणगाव  शिवसत्ता टाइम्स (नरेश पाटील) :-

खांदाड गावातील रहिवासी भागालगत असलेल्या मोठ्या तलावामध्ये शुक्रवारी (दि. २७ जून) दुपारी सुमारे २.४० वाजता मगर दिसल्याची पुष्टी झाली आहे. ही मगर गावातील काही महिला व मुलांनी पाहिल्याचे सांगण्यात आले असून, त्यांनी आपल्या मोबाईलमध्ये या घटनेचे व्हिडिओ शूट केले आहेत…
ही बातमी गावात झपाट्याने पसरली आणि अनेक नागरिक व्हिडिओद्वारे याची खात्री करत घटनास्थळी धावले. मागील दोन वर्षांतही अशाच प्रकारे या तलावात मगर दिसल्याच्या घटना घडल्यामुळे यंदाची घटना सलग तिसऱ्या वर्षी घडली आहे. त्यामुळे ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले असून, स्थानिक प्रशासनाने त्वरित उपाययोजना करावी, अशी मागणी होत आहे.
त्याच दिवशी आमचे प्रतिनिधी तलावाजवळील ज्येष्ठ नागरिक वॉलेराव यांच्याशी बोलून परतत असताना तलावातून मोठा आवाज आला. लक्ष वेधले असता पाण्यावर मगराचे तोंड दिसल्याचे त्यांनी सांगितले. ही मगर दोन-तीन वेळा दिसली, मात्र मोबाईलमध्ये टिपण्याआधी ती पाण्यात निघून गेली.
या तलावात मागील काही दिवसांपासून मगर असल्याची चर्चा गावात सुरू होती, आणि आता ती प्रत्यक्ष व्हिडिओद्वारे सिद्ध झाली आहे. याआधी वनखात्याने ‘मगरीचा प्राभल्य, सावधान’ असे फलक लावून व तलावाभोवती हिरव्या नायलॉनच्या जाळ्या बसवल्या होत्या, मात्र कुत्र्यांच्या वावरामुळे त्या नष्ट झाल्या आहेत.
काही दिवसांपूर्वीच गावाच्या जवळच असलेल्या काळ नदीकाठावर युवकांना मगरांची अंडी व पिल्ले मोठ्या संख्येने आढळून आली होती. मात्र या तलावात मोठी मगर असल्याने धोका अधिक असल्याचे ग्रामस्थांचे म्हणणे आहे.दरम्यान, वनखात्याशी संपर्क साधल्यावर त्यांनी या घटनेची दखल घेत वरिष्टांना सांगणार आहे म्हणून सांगितले.