पनवेलमध्ये फुटपाथवर आढळले नवजात अर्भक… कृपया मला माफ करा…जन्मदात्यांच्या भावनिक चिठ्ठीने शहर हळहळले…

0
7

पनवेल शिवसत्ता टाइम्स (धनंजय कवठेकर):- 

नवी मुंबईतील पनवेल परिसरात एक हृदय पिळवटून टाकणारी घटना समोर आली आहे.पनवेल येथील तक्का भागात असलेल्या स्वप्नालय आश्रमाच्या बाहेर दोन दिवसांचे अर्भक आढळले आहे. याबाबत सविस्तर घटना अशी की शहरातील तक्का विभागात असलेल्या स्वप्नालय या मुलींच्या बालगृहाजवळ, फुटपाथवर दोन दिवसांचं नवजात अर्भक सापडलं. हे बालगृह महिला आणि बालविकास विभाग, महाराष्ट्र शासनाचे मान्यताप्राप्त असून, या संस्थेच्या इमारतीच्या खालच्या भागातच एका बास्केटमध्ये अर्भक आढळून आलं. प्रत्यक्षदर्शी आणि स्थानिक नागरिकांनी दिलेल्या माहितीनुसार, हे अर्भक रात्रीच्या वेळेस कोणीतरी सोडून गेलं असावं. बास्केटमध्ये अर्भकाबरोबर सेरेलॅक, कपडे आणि एक इंग्रजीत लिहिलेली चिठ्ठीही सापडली. या चिठ्ठीत मी माझ्या बाळाचा सांभाळ करू शकत नाही. माझी आर्थिक परिस्थिती वाईट आहे, मानसिकदृष्ट्या मी सक्षम नाही. माझ्या बाळाची हेळसांड होऊ नये, त्याची काळजी घ्या. भविष्यात मला बाळाला भेटता आलं, तर नक्की भेटेन. कृपया मला माफ करा.”असे लिहिले आहे.स्वप्नालय आश्रमाजवळील ही घटना लक्षात येताच, पनवेल महापालिकेचे अधिकारी व कर्मचाऱ्यांनी अर्भक ताब्यात घेतलं आणि लगेच खाजगी रुग्णालयात नेलं. डॉक्टरांनी तपासणी केल्यानंतर अर्भकाची प्रकृती सध्या ठीक असल्याचं सांगितलं आहे. यानंतर अर्भक पनवेल शहर पोलीस ठाण्यात सोपवण्यात आलं असून, पोलीस अर्भकाची काळजी घेत आहेत. तसेच, अर्भक कुणी ठेवलं याचा शोध घेण्यासाठी त्या परिसरातील सीसीटीव्ही फुटेज पोलीस तपासत आहेत. या घटनेने स्थानिकांमध्ये हळहळ व्यक्त होत असून, संबंधित आई-वडिलांची ओळख पटवण्यासाठी पोलीस अधिक तपास करत आहेत.