चौक शिवसत्ता टाइम्स (अर्जुन कदम):-
मूळ वावंढळ गाव आणि कोयना प्रकल्पग्रस्त वसाहत यांना जोडणारा पुल धोकादायक स्थितीत असल्याचे रायगड जिल्हा परिषद बांधकाम विभागाने जाहीर केले असून, या पुलाचा वापर करू नये असे आवाहन करण्यात आले आहे….
कोयना प्रकल्पग्रस्त वसाहत या गावा शेजारी शिवकालीन तलावाजवळ नाल्यावर जुना अरुंद व कमी उंचीचा पुल असून, तो धोकादायक अवस्थेत असल्याचे पत्र, पत्रकार आणि माजी सरपंच अर्जुन कदम यांनी रायगड जिल्हा परिषद यांच्या बांधकाम विभागास कळविले होते… रायगड जिल्हा परिषदेच्या खालापूर येथील बांधकाम विभागाच्या अभियंता यांना प्रत्यक्ष पुलाची वस्तुस्थिती दाखविली होती… हा पुल शिवकालीन तलावाजवळ असून, मूळ वावंढळ गाव व कोयना प्रकल्पग्रस्त वसाहत यांना जोडणारा प्रमुख मार्ग आहे, याच पुलावरून प्राथमिक शाळा वावंढळ, ग्रामपंचायत कार्यालय, पिण्याच्या पाण्याची विहीर असून, कोयना प्रकल्पग्रस्त ग्रामस्थ यांची सर्व शेत जमिनीकडे जाण्याचा मार्ग आहे, याच पुलाच्या पलिकडील भागात नागरी वसाहत उभी राहत असून, त्यांनाही याच पुलाचा वापर करावा लागत आहे… तर गुगल मॅपवर हाच रस्ता दिसत असल्याने अनेकजण या मार्गाचा वापर करतात…. हा पुल उंचीने कमी आहे… पावसाळ्यात पुलाखालून पाणी जाण्यासाठी एकच गाळा असल्याने व डोंगर भागातून, परिसरातील शेतातून येणारे पाणी गाळा अरुंद असल्याने त्वरीत पाण्याचा निचरा होत नाही, त्यामुळे पाणी पुलावरून व पुलाजवळील घरांच्या आवारात शिरत असल्याने धोकादायक स्थिती निर्माण होते… याठिकाणी अरुंद पुल असल्याने मोठ्या गाड्या जात नाही… सध्या पुलाची वाईट अवस्था झाली असून, या पुलाचा वापर करू नये अशा संदर्भाचा फलक कार्यकारी अभियंता बांधकाम विभाग रायगड जिल्हा परिषद यांनी लावला आहे…. तसेच पुलावरून पाणी जात असल्यास अवजड वाहने घेऊन जाऊ नये, असे आवाहन करण्यात आले आहे.