गोमातेला आई म्हणायचं…पण रक्षण करायला कुणाला वेळ नाही?… रस्त्यांवर मोकाट व बेवारस जनावरे…अपघातांना निमंत्रण…

0
32

रोहा शिवसत्ता टाइम्स (ओमकार नागावकर):-

गोमातेला माता मानणाऱ्या समाजात,तिचंच रक्षण करण्याची जबाबदारी कोणीच घेत नाही, हे वास्तव सध्या गोफण व कुंभोशी परिसरात दिसून येते..रस्त्यावर मोकाट व बेवारस गुरांचा सुळसुळाट झाला असून, वाहनचालकांच्या जिवाशी रोजचा खेळ सुरू आहे…अपघातांची मालिका सुरू असतानाही स्थानिक प्रशासन,ग्रामपंचायत व लोकप्रतिनिधींचे दुर्लक्ष संतापजनक आहे…

चणेरा-गोफण ते कुंभोशी दरम्यान रस्त्यांवर कळप-कळपाने गायी, बैल, वासरे मोकाट फिरताना दिसत आहेत. विशेषतः बेवारस गायी ठिकठिकाणी रस्त्यावर ठिय्या मारून बसत असून, वाहनधारकांना अर्धा रस्ता वापरावा लागत आहे. त्यामुळे अपघात व वाहतूक कोंडीने नागरिक त्रस्त झाले आहेत. पण गोफण ग्रामपंचायत याकडे डोळेझाक करत असल्याचं स्पष्ट होत आहे.

कुंभोशी परिसरात वीस-पंचवीस गायींचे कळप रस्त्यावर ठाण मांडून बसतात. यातील अनेक गायी बेवारस असून त्यांचं कोणीही मालकी हक्क सांगत नाही. रात्रीच्या वेळी पथदीप नसल्यानं वाहनचालकांना हे जनावरे दिसतच नाहीत. परिणामी धडकांचे प्रकार घडत असून, जीवितहानीची शक्यता दिवसेंदिवस वाढते आहे.

मोकाट जनावरांचे मालक सहजतेने आपली गुरं रस्त्यावर सोडून मोकळे होतात. काही प्रकरणांत जनावरे बेवारस असून, त्यांच्यावर देखरेखीची कोणतीही व्यवस्था नाही. मात्र प्रशासन अशा बेजबाबदार मालकांवर कारवाई करत नाही. नागरिकांच्या सातत्याने तक्रारी असूनही ना ग्रामपंचायत ना पोलीस विभाग कोणती ठोस कारवाई करत आहे. लोकप्रतिनिधीही बघ्याची भूमिका घेत असल्यामुळे समस्या दिवसेंदिवस विकोपाला जात आहे.

“गोमाता” म्हणणं सोपं आहे, पण तिचं रस्त्यावर मरण येऊ नये यासाठी प्रयत्न करणं हे समाजाचं, प्रशासनाचं व प्रतिनिधींचं कर्तव्य आहे. मोकाट व बेवारस जनावरांमुळे निर्माण झालेला जीवघेणा धोका तात्काळ दूर करावा, अशी आग्रही मागणी ग्रामस्थांनी केली असून, यासाठी कायमस्वरूपी उपाययोजना राबवाव्यात, अन्यथा आंदोलनाचा इशारा नागरिकांनी दिला आहे.