रायगड शिवसत्ता टाइम्स (अमुलकुमार जैन):-
महिला आज पुरुषांच्या बरोबरीने खांद्याला खांदा लावून विविध क्षेत्रात करिअर करत असून आज देखील महिला सर्वच ठिकाणी सुरक्षित आहेत,याबाबत कोणतीही शाश्वती देता येत नसल्याचे मांडवा पोलीस ठाण्याचे हद्दीत घडलेल्या घटनेवरून दिसून येत आहे. अलिबाग तालुक्यातील मांडवा सागरी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील किहीम येथे चालत जाणाऱ्या महिलेला भररस्त्यात गाठून माझ्या सोबत शारीरिक संबंध ठेव, अन्यथा तुला मी ठार मारेन,अशी धमकी आरोपीने दिल्याचा धक्कादायक प्रकार घडला असल्याने महिलेने पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला असून पोलिसांनी धडक कारवाई करत आरोपीला अटक केली आहे.या घडलेल्या घटनेनंतर एकच खळबळ उडाली असून महिला सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे,याबाबत पोलिसांनी आरोपीविरुद्ध कडक कारवाई करण्याची मागणी करण्यात येत आहे.
याबाबत मांडवा सागरी पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी महिला हि १६ जून २०२५ रोजी सकाळी ९:३० वाजण्याच्या सुमारास किहीम आरसीएफ कॉलनी समोरून जात असताना आरोपी आपल्या काळ्या रंगाची दुचाकी मोटार सायकल क्रमांक एम एच ०६ बीटी ३१५७ यावरून येऊन रस्ता अडवत महिलेला माझ्या सोबत शारीरिक संबंध ठेव, असे बोलून फिर्यादी यांचे मनास लज्जा उत्पन्न केली, व फिर्यादी शारीरिक संबंध ठेवले नाहीस तर तुला जीवे ठार मारेन अशी धमकी दिली, यावर महिलेने आरोपीला मी तुझ्या सोबत शारीरिक संबंध ठेवणार नाही, असे सांगितले, तेव्हा आरोपीने तिथून आपल्या दुचाकी वरून पळ काढला. यानंतर फिर्यादी महिलेने १६ जून २०२५ रोजी दुपारी ३:३० वाजताच्या सुमारास मांडवा सागरी पोलीस ठाण्यात जाऊन झालेल्या घटनेची माहिती दिली असता यावर मांडवा सागरी पोलीस ठाण्याचे अंमलदार पो.ह.वा. श्री. शिद यांनी आरोपीविरुद्ध कॉ. गु. रजि. न. ७९/ २०२५ भा. न्या. सं. कलम ७४(२), ७८, ७९, ३५१(२)(३), आदी कलमान्वये गुन्हा दाखल केला. या गुन्ह्याचा महिला पो.ह.वा. ए. व्ही. करावडे यांनी पुढील तपास करीत आरोपीत रा. परहुरपाडा ता. अलिबाग, जि. रायगड या आरोपीच्या मुसक्या आवळत त्याला अटक केली व गुन्हा दाखल झाल्यानंतर २४ तासाच्या आत गुन्ह्याचा तपास पूर्ण करून आरोपीविरुद्ध दोषारोप पत्र तयार करून दोषपत्र सोबत आरोपी यास मा. न्यायालयात हजर करून त्याला मा न्यायालयाने न्यायालयीन कोठडीमध्ये पाठवले आहे.
यापूर्वीही गेल्या मार्च महिन्यात मांडवा पोलिसांनी कनकेश्वर देवस्थान येथे अशाच प्रकारच्या घडलेल्या महिलेच्या विनयभंग प्रकरणाच्या घटनेत आरोपी विरुद्ध कडक कारवाई करत २४ तासाच्या आत गुन्हा दाखल करून मा. न्यायालयात दोषारोप पत्र दाखल करत आरोपीला शिक्षा सुनावली होती, याबद्दल मांडवा सागरी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक दिपक भोई व त्यांच्या सहकाऱ्यांचे महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अधिवेशनात विशेष कौतुक केले होते. मांडवा सागरी पोलिसांनी केलेल्या कारवाईची सर्व स्तरातून कौतुक केले जात आहे.
नुकत्याच या धक्कादायक घडलेल्या घटनेबाबतीत अधिक तपास मांडवा सागरी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक दिपक भोई यांच्या मार्गदर्शनाखाली महिला पो.ह.वा. ए. व्ही. करावडे यांनी केलेला आहे.