कोणी स्मशानभूमी देता का स्मशानभूमी ?रहिवाशांचा रोष…द्रोणागिरी नोडमध्ये स्मशानभूमी,दफनभूमीसारख्या मूलभूत सुविधांचा अभाव

0
30

उरण शिवसत्ता टाइम्स (प्रविण पाटील):-

उरण तालुक्यातील द्रोणागिरी नोड परिसरात स्मशानभूमीची सुविधा उपलब्ध नसल्याने येथील रहिवाशांना मृत्यूच्या प्रसंगी देखील मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे.मृतदेह अंतिम संस्कारासाठी तीन ते चार किलोमीटर अंतरावरील बोकडविरा वा फुंडे येथील स्मशानभूमीकडे नेण्याची वेळ नातेवाईकांवर येत आहे.त्यामुळे येथील नागरिकांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त होत आहे.
सिडकोने द्रोणागिरी नोडमध्ये गृहनिर्माण आणि व्यावसायिक भूखंडांची विक्री करून मोठ्या प्रमाणावर महसूल कमावला आहे. मात्र नागरी सुविधांच्या उपलब्धतेबाबत सिडको प्रशासनाची  भूमिका ढासळलेली दिसून येते.या वसाहतीच्या झपाट्याने होत असलेल्या नागरीकरणासोबत स्मशानभूमी आणि दफनभूमीसारख्या मूलभूत सुविधांचा अभाव खटकण्यासारखा आहे.
येथे अनेक जाती-धर्मांचे नागरिक वास्तव्यास असून, अंत्यविधीच्या वेळी दुरवर जावे लागणे हे केवळ शारीरिक नव्हे तर मानसिक थकवा निर्माण करणारे आहे,” असे मत अनेक स्थानिकांनी व्यक्त केले. दरम्यान,मागील वर्षी अशाच एका घटनेत, एका महिलेला बोकडविरा येथे अंत्यसंस्कारासाठी नेण्यात आले असताना दुर्लक्षामुळे तिच्या मृतदेहाची विटंबना झाल्याची खेदजनक घटना घडली होती. त्या वेळी ग्रामस्थांनी सामाजिक भावनेतून पुढाकार घेऊन अंत्यसंस्कार पुन्हा योग्यरीत्या पार पाडले, अशी माहिती सामाजिक कार्यकर्ते जगदीश भोईर यांनी दिली. रहिवाशांनी सिडकोकडे द्रोणागिरी नोड परिसरात अत्याधुनिक सुविधांनी युक्त स्मशानभूमी व दफनभूमीची तातडीने उभारणी करावी,अशी जोरदार मागणी केली असून यासंदर्भात पुढील काही दिवसांत निवेदन सादर करण्याची शक्यता आहे.