खांडस गावात घरावर झाड कोसळून मोठे नुकसान… सुदैवाने कोणतीही जीवितहानी नाही…घर मालकाचे नुकसान…

0
15

रायगड शिवसत्ता टाइम्स (अमुलकुमार जैन):-

कर्जत तालुक्यातील खांडस गावात घरावर झाड कोसळल्याची घटना समोर आली आहे.सुदैवाने यात कोणतीही जीवित हानी झाली नसली तरी मात्र घर मालकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.कर्जत तालुक्यातील खांडस गावातील जगदीश पुंडलिक ऐनकर यांच्या घरासमोर पिंपळाचे मोठे झाड जीर्ण झालेल्या अवस्थेत होते. झाडाची मुळे जमिनीतून पूर्ण वर आले होते. मागील दोन वर्षांपूर्वी या झाडाच्या काही फांदया जगदीश ऐनकर यांच्या घरावर पडल्या होत्या त्यामुळे त्यांचे नुकसान देखील झाले होते.

मात्र त्यानंतर हे पूर्ण झाड एक दिवस नक्कीच पडेल अशी त्यांना खात्री होती. म्हणून जगदीश ऐनकर यांनी खांडस ग्रामपंचायत प्रशासना कडे पत्रव्यवहार करून हे झाड जीर्ण झाल्याची माहिती देऊन झाड तोडण्यात यावे अशी मागणी केली होती मात्र ग्रामपंचायत प्रशासनाने याकडे दुर्लक्ष केले.रविवारी दुपारच्या सुमारास हे झाड पूर्णतः कोसळले असून सुमंत मारुती ऐनकर, पुंडलिक भाऊ ऐनकर, विठ्ठल भाऊ ऐनकर यांच्या घराचे मोठे नुकसान झाले आहे.

घरातील सर्व व्यक्ती बाहेर असल्यामुळे कोणालाही इजा झाली नाही. मात्र घराचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.ग्रामपंचायात प्रशासनाला याबाबत पूर्व कल्पना दिली असून सुद्धा दुर्लक्ष केल्याने ऐनकर यांनी संताप व्यक्त केला आहे.या घराचे तात्काळ पंचनामे करून नुकसान भरपाई मिळावी अशी मागणी ऐनकर कुटुंबियांनी प्रशासनाकडे केली आहे.