माणगाव शिवसत्ता टाइम्स (नरेश पाटील) :-
खांदाड येथे स्थलांतरित करण्यात आलेल्या शासकीय स्वस्त धान्य पुरवठा वितरण केंद्रामार्फत रेशन दुकान क्रमांक ५ यांच्याकडे अतिरिक्त जबाबदारी सोपवण्यात आली आहे. या अंतर्गत दुकान क्रमांक १ च्या लाभार्थ्यांना सेवा दिली जात आहे. यासंदर्भात संबंधित पुरवठा दुकानदारांकडून आवाहन करण्यात आले आहे की, शिधावाटपाचा लाभ सुरळीतपणे घेण्यासाठी सर्व लाभार्थ्यांनी आपली ‘केवायसी’ (KYC – ग्राहक ओळख प्रक्रिया) दिनांक १० जुलै २०२५ या अंतिम मुदतीपूर्वी पूर्ण करणे अत्यावश्यक आहे. ही प्रक्रिया दिनांक १ जुलै २०२५ पासून सुरू करण्यात आली आहे. सदर वितरण केंद्रात सुमारे ८०० शिधापत्रिका लाभार्थी धारक असून, आतापर्यंत ४०० पेक्षा अधिक लाभार्थ्यांनी केवायसी प्रक्रिया पूर्ण केली आहे. केवायसी प्रक्रियेसाठी लाभार्थ्यांनी आधार कार्ड, नोंदणीकृत मोबाईल क्रमांक आणि कुटुंबातील सर्व सदस्यांसह शिधावाटप केंद्रावर सायंकाळी किंवा रात्री ८ वाजेच्या आत उपस्थित राहून POS मशीनवर अंगठ्याचा ठसा देऊन ओळख पटवणे आवश्यक आहे. ही प्रक्रिया वेळेत पूर्ण न करणाऱ्यांना पुढील शिधावाटपाचा लाभ मिळणार नाही, असे स्पष्ट करण्यात आले आहे. कोणत्याही प्रकारचा अडथळा निर्माण होऊ नये म्हणून सर्व लाभार्थ्यांनी अंतिम तारखेच्या आत ही प्रक्रिया पूर्ण करावी, असे आवाहन करण्यात आले आहे. अधिक माहितीसाठी लाभार्थ्यांनी खांदाड येथील अॅनेक्स युनिटमधील शिधावाटप दुकानदारांशी थेट संपर्क साधावा, असे आवाहनही पुरवठादारांकडून करण्यात आले आहे.