अलिबाग-चौल नाका रस्त्यावरील खड्ड्यांमुळे नागरिक त्रस्त…नागरिकांना रोजच्या प्रवासात गंभीर अडचणी, अपघाताचा धोका…

0
11

अलिबाग शिवसत्ता टाइम्स (धनंजय कवठेकर) :-

अलिबाग ते कुरुळ चौल नाका दरम्यानचा मुख्य रस्ता सध्या अत्यंत खराब अवस्थेत असून, या मार्गावर मोठमोठे खड्डे पडले आहेत.त्यामुळे नागरिकांना रोजच्या प्रवासात गंभीर अडचणींना सामोरे जावे लागत आहे.
या रस्त्याचा वापर शाळकरी विद्यार्थी, कामगार, रुग्णवाहिका, एसटी बस व खासगी वाहनांनी मोठ्या प्रमाणावर होतो. मात्र सध्या खड्ड्यांमुळे प्रवास करताना अपघाताची भीती कायम असते. अनेक दुचाकीस्वारांना घसरून दुखापती झाल्याच्या घटना घडल्या असून, रुग्ण व वयोवृद्ध व्यक्तींना रुग्णालयात पोहोचवणे देखील धोकादायक ठरते आहे.
स्थानिक नागरिकांच्या मते, प्रशासनाने वेळोवेळी तक्रारी करूनही अद्याप कोणतीही ठोस उपाययोजना केली नाही. रस्त्याची डागडुजी त्वरित न केल्यास नागरिकांकडून तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा देण्यात आला आहे.
या पार्श्वभूमीवर संबंधित प्रशासनाने आठ दिवसांच्या आत खड्ड्यांची तातडीने डागडुजी करून रस्त्याची योग्य दुरुस्ती करावी, अशी मागणी करण्यात आली आहे. अन्यथा होणाऱ्या संभाव्य अपघातास व नागरी संतापाला जबाबदार कोण, असा सवाल उपस्थित होत आहे.नागरिकांनी प्रशासनाच्या कार्यपद्धतीवर नाराजी व्यक्त करत लवकरात लवकर ठोस कारवाईची मागणी केली आहे. अन्यथा या मार्गावरून होणारी वाहतूक आणि जनजीवन पूर्णपणे विस्कळीत होण्याची शक्यता आहे.