मालेगावात मनपा कर्मचाऱ्याचा थरारक खून… मालेगाव बीडच्या दिशेने? नागरिकांमध्ये दहशतीचे वातावरण…

0
18

नांदगाव शिवसत्ता टाइम्स (अनिल धामणे):- 

मालेगाव शहरात गुन्हेगारीचे सावट पुन्हा गडद होत चालल्याचं चित्र समोर आलं आहे. काल रात्री दि 31 जुलै रोजी, नानावटी पेट्रोल पंपा जवळील साईराम डेअरी समोर उभ्या असलेल्या नितीन अर्जुन निकम (रा आयेशा नगर, भीमनगर) या युवकाचा तिघा हल्लेखोरांनी निर्घृण खून केला. संपूर्ण हत्येचा थरारक व्हिडिओ सीसीटीव्हीत कैद झाला असून, शहरात खळबळ उडाली आहे.

रात्री सुमारे १२ वाजता, नितीन निकम उभा असताना सचिन सच्चा अहिरे, परेश फुलचंद पगारे आणि केतन अजय अहिरे या तिघांनी मोटरसायकलवर येऊन त्याच्यावर धारदार शस्त्रांनी हल्ला चढवला. इतक्यावरच न थांबता, आरोपींनी सुमारे ८-१० किलो वजनाचा मोठा दगड त्याच्या डोक्यावर टाकून नितीनचा छळ मृत्यू केला. मृताची ओळख पुसावी, हा हेतूच यात दिसून येतो.

नितीन निकम हा मालेगाव महानगरपालिकेचा कर्मचारी होता. या हत्येने प्रशासनाला थेट आव्हान दिलं आहे. मागील काही दिवसांत शहरात गोळीबार, धारदार शस्त्रांनी हल्ले आणि आता थेट खून यामुळे शहरात कायदा-सुव्यवस्थेचा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे.

मालेगावातील वाढते गुन्हेगारी प्रकार पाहता, ‘हे शहर बीड बनत चाललंय का?’ असा सवाल नागरिक विचारू लागले आहेत. विशेषतः या आठवड्यातील घटनांनी सर्वसामान्य जनतेत दहशतीचे वातावरण निर्माण झालं आहे. पोलिस प्रशासनाच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह निर्माण होत असून, कठोर कारवाईची मागणी होत आहे.या प्रकरणी मालेगाव शहर पोलिस ठाण्यात गुन्हा रजि. नं. 197/2025 भारतीय दंड विधान कलम 109(1), 3(5) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपींना अटक करण्यात आली असून, त्यांना मालेगाव न्यायालयात हजर करण्याची प्रक्रिया सुरू आहे. पुढील तपास सहायक पोलिस निरीक्षक योगेश पाटील करत आहेत.शहरात गस्त वाढवा, गुन्हेगारांवर कठोर कारवाई करण्याची मागणी नागरिकांनी केली आहे…