ज्ञानदेव पोवार यांच्या राजकीय भूकंपाची तयारी, ४८ तासांत मोठा निर्णय… 

0
12

माणगाव शिवसत्ता टाइम्स (नरेश पाटील):-

दक्षिण रायगडात मोठा राजकीय भूकंप होण्याची शक्यता आहे, कारण ज्येष्ठ नेते ज्ञानदेव पोवार यांनी आगामी ४८ तासांत ऐतिहासिक राजकीय निर्णय घेणार असल्याचे जाहीर केले, जो स्थानिक व जिल्हास्तरीय राजकारणाचे समीकरण बदलण्याची शक्यता निर्माण करतो. आमच्या प्रतिनिधींशी बोलताना पोवार म्हणाले, “आता कोण कुठे गेले हे स्पष्ट झाले आहे, आणि म्हणूनच वेळ आली आहे मोठा निर्णय घेण्याची. हा निर्णय दक्षिण रायगडाच्या राजकारणात खळबळ माजवणारा ठरेल.” विशेष लक्षवेधी बाब म्हणजे महाडचे आमदार व राज्याचे मंत्री भरतशेठ गोगावले यांनी माणगाव येथील पोवार यांच्या निवासस्थानी जाऊन गोपनीय चर्चा केली, यामुळे राजकीय पडद्यामागे घडणाऱ्या हालचालींना वेग आला आहे.

तसेच, पोवार आणि त्यांच्या कट्टर समर्थकांनी संपूर्ण दक्षिण रायगडात दौरे सुरू केले असून, कार्यकर्त्यांशी प्रत्यक्ष भेटीगाठी करत आहेत. या व्यापक जनसंपर्क मोहिमेमुळे माणगावमध्ये एक भव्य जाहीर कार्यक्रम  अवघ्या ४८ तासांत पार पडणार असल्याची ठोस शक्यता निर्माण झाली आहे. नुकताच माणगावात राजकीय उलथापालथ मोठ्या प्रमाणात दिसून आली आहे, अनेक नेते व पदाधिकारी पक्षांतर करताना दिसले आहेत. अशा पार्श्वभूमीवर रायगड जिल्ह्याचे माजी जिल्हा परिषद सभापती व माजी नगरपंचायत अध्यक्ष, ज्ञानदेव पोवार ज्यांनी अनेक महत्त्वाची पदे भूषवली आहेत, हे पुन्हा केंद्रस्थानी येत आहेत. त्यांनी कोणत्या पक्षात जाणार हे उघड केलेले नसले तरी एक ठाम संकेत दिलाकि “नव्या युगात विकास साधायचा असेल आणि राजकीय पुनरुत्थान घडवायचे असेल, तर एक मजबूत गॉडफादर आवश्यक आहे. मी माझा निर्णय घेतला आहे.” त्यामुळे त्यांचा कल राज्यात सत्तेतील युतीकडे असल्याचे स्पष्ट संकेत मिळत आहेत.

या दरम्यान बातमी छापता छापता क्षणी मिळालेली माहिती अशी की, एका राष्ट्रीय पक्षाने देखील पोवार यांच्याशी संपर्क साधून पक्षात सामील होण्याचे आमंत्रण दिले आहे, ही घडामोड या राजकीय नाट्याला आणखी रंगतदार बनवते. यासह आपल्या शेवटच्या वक्तव्यात त्यांनी ठामपणे म्हटले – “मी एका पक्षात अधिकृतपणे सामील झाल्यानंतर माणगाव पुन्हा माझे होईल. मी केवळ माझ्या जुन्या विरोधकाला नाही, तर नुकताच उपमुख्यमंत्री नामदार अजित पवार पक्षा मध्ये गेलेल्या माझ्या एकेकाळच्या निकटवर्तीयालाही योग्य उत्तर देईन असे त्यानी त्याचे नाव न घेता सांगितले.” आता संपूर्ण रायगड जिल्हा आणि विशेषतः माणगावात एकच चर्चा आहे.  “पोवार काय निर्णय घेणार?” पुढचे ४८ तास हे दक्षिण रायगडाच्या राजकारणात निर्णायक ठरणार आहेत.