रायगड शिवसत्ता टाइम्स (अमुलकुमार जैन):-
वडखळ पुलाखाली टेम्पोमध्ये दाटीवाटीने व निर्दयतेने ६ म्हशींची बेकायदेशीर वाहतूक करताना दोन आरोपींना अटक करण्यात आली. ही घटना रायगड जिल्ह्यातील पेण तालुक्यातील असून, अटक करण्यात आलेले आरोपी रेहान अस्लम अल्वी (२५) व मोहम्मद नदीम कुरेशी (३४) हे मुंबईतील गोवंडी येथील रहिवासी आहेत.
ही कारवाई वडखळ वाहतूक शाखेचे अधिकारी विनोद रामचंद्र भगत यांच्या फिर्यादीवरून करण्यात आली. या प्रकरणी प्राणी छळ प्रतिबंधक अधिनियम १९६० व मोटार वाहन अधिनियम १९८८ अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला असून, गुन्हा क्र. ८३/२०२५ प्रमाणे नोंद झाला आहे.
टेम्पो क्र. MH-06/BW-8830 मध्ये ६ म्हशी अत्यंत अमानुषरीत्या दोऱ्यांनी बांधून, कोणत्याही पाणी-चाऱ्याविना नेल्या जात होत्या.अंदाजे ₹९.७३ लाखांची एकूण मालमत्ता जप्त करण्यात आली.यामध्ये ६ म्हशी/रेडा (किंमत: ₹१.७३ लाख),पिकअप टेम्पो (किंमत: ₹८ लाख)आहे…
जप्त प्राणी पेणजवळील इरवडी येथील स्वामी गोशाळेत सुखरूप हस्तांतरित करण्यात आले आहेत. कारवाई पोलिस उपनिरीक्षक संदेश पाटील यांच्या नेतृत्वाखाली तर तपास पोलीस निरीक्षक प्रसाद पांढरे यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे.
या प्रकारामुळे जिल्ह्यातील अवैध प्राणी वाहतुकीबाबत गंभीर प्रश्न उपस्थित झाला असून, प्रशासनाकडून अधिक कठोर कारवाईची अपेक्षा व्यक्त होत आहे.