माणगाव शिवसत्ता टाइम्स (नरेश पाटील):-
माणगावचे लोकप्रिय नेते ज्ञानदेव पोवार यांनी सोमवार (दि.11 ऑगस्ट 2025) संध्याकाळी वार्तालाप करताना सांगितले की ते मंत्री भरतशेठ गोगावले यांच्या नेतृत्वाखालील शिंदे गटात प्रवेश करणार आहेत. हा पक्ष प्रवेश कार्यक्रम बुधवार,दि. 13 ऑगस्ट म्हणजेच आज दुपारी 3 वाजता होणार आहे.आज भव्य शक्तीप्रदर्शन होणार असून कार्यक्रमाची सुरुवात हॉटेल कार्तिकपासून मोटारसायकल रॅलीने होईल. त्यानंतर माणगावच्या मुख्य बाजारातील एस.टी. स्टँडजवळील पोवार यांच्या हॉटेल स्टॉलवर मंत्री गोगावले यांच्या उपस्थितीत स्वागत होईल. येथून निजामपूर रोडमार्गे गांधी हॉलपर्यंत पायी मार्ग काढण्यात येईल. यावेळी लोकप्रिय ‘काळू बाजे’ स्थानिक वाद्यवृंदाची साथ लाभणार असून, गांधी हॉल येथे मुख्य प्रवेश सोहळा पार पडणार आहे.दरम्यान ज्ञानदेव पोवार यांनी सांगितले की या कार्यक्रमात “फक्त आणि फक्त माणगावकरांचा” उत्स्फूर्त सहभाग असेल.
दरम्यानच्या काळात खा. सुनील तटकरे यांचे एकमेव भक्कम प्रतिस्पर्धी म्हणून ओळखले जाणारे पोवार हे माणगावच्या राजकारणातील प्रभावी नेते आहेत. अलीकडेपर्यंत त्यांचा राजकीय प्रभाव राजीव साबळेसोबत सामायिक होता. मात्र, साबळे यांनी नुकताच काही दिवसापूर्वी शिंदे पक्ष सोडून तटकरे समर्थक राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) गाठल्याने दोघांमधील संबंध बिघडल्याची चर्चा आहे.पोवार यांच्या या प्रवेशामुळे स्थानिक पातळीवर आपला जनाधार मजबूत करण्याचा आणि आगामी राजकीय लढतीसाठी ताकद दाखवण्याचा त्यांचा हेतू असल्याचे राजकीय वर्तुळात मानले जात आहे..