हाळ खुर्द गावातील पाण्याची टाकी घेतेय अखेरचा श्वास ?… मुख्य कॉलमला तडे गेल्याने कोसळण्याची भिती… 

0
1

खोपोली शिवसत्ता टाइम्स (खलील सुर्वे):-

ग्रामपंचायतीच्या काळात रहिवाशांची तहान भागवून जीवनदायिनी ठरलेली पाण्याची टाकी आज मोडकळीस आली असून, शेवटच्या घटका मोजत आहे. टाकीच्या मुख्य कॉलमला तडे गेल्याने टाकीशेजारी राहणाऱ्या लोकांच्या जीवाला धोका निर्माण झाला आहे…त्यामुळे रहिवाशांमध्ये भीतीचे सावट पसरले असून,संबंधित प्रशासन दुर्घटना घडण्याची वाट पाहणार आहे का ?असा सवाल उपस्थित केला जात आहे.अंदाजे २००३ मध्ये हाळ गावातील रहिवाशांची तहान भागविण्यासाठी पाण्याच्या टाकीचे बांधकाम करण्यात आले होते. या टाकीची अंदाजे ५० हजार लिटर पाणी साठवण्याची क्षमता असल्याचे समजते. मात्र, प्रत्येक वेळी कर्मचारी व स्थानिकांनी तोंडी ग्रामपंचायत व प्रशासकीय अधिकारी यांना वस्तुस्थिती सांगितल्यानंतर सुद्धा टाकी पाडण्याविषयी कुठलीही कारवाई झाली नसून उलट दररोज पाणी भरले जात असल्याची माहिती सूत्रांकडून मिळत आहे. पाण्याच्या टाकीला अंदाजे २२ वर्षाचा कालावधी होऊन गेला असल्याची चर्चा आहे. ऊन व पावसाच्या तडाख्याने टाकी मोडकळीस आली आहे. अंदाजे मुख्य एक ते दोन कॉलमची झीज होऊन भरमसाठ वजन पेलण्याची क्षमता नसून, स्लॅब व कॉलमच्या आतील लोखंडी सळ्या उघड्या पडल्या असल्याचे दिसून येत आहेत.

हाळ ग्रामपंचायत कार्यालयच्या जवळच्या अंतरावर ही धोकादायक टाकी उभी आहे. टाकीच्या बाजूच्या जागेत  स्थानिक रहिवाशांची घरे असून लहान मुले येथे खेळताना दिसतात. टाकीची अवस्था लक्षात घेता ती कधी कोसळून पडेल याची शाश्वती नाही. त्यामुळे टाकीच्या बाजूला घरांसाठी आलेले विजेची तारे तुटून मोठी जीवितहानी होण्याचा धोका निर्माण झाला आहे. कधी काळी जीवनदायिनी ठरलेली पाण्याची टाकी उद्या हाळकरांचा काळ ठरणार नाही, याची दक्षता घेऊन संबंधित प्रशासनाने पाण्याची टाकी पडायची किंवा दुर्घटना घडण्याची वाट न पाहता, योग्य ती कार्रवाई करावी, अशी मागणी होत आहे. स्थानिक प्रशासन पत्र व्यवहार करीत वेळ काढत हाळ वासियांचे जीव धोक्यात घालत असल्याचे दिसून येत आहे.

हाळ खुर्द ग्रामपंचायतीची पाण्याची टाकी पाहिल्यावर कुठे थांबावे…कुठे जावे…कुठे धावावे…टाकी कोसळ्यास कसे जीव वाचवावे…अंगावर पडल्यावर काय होणार ?असे अनेक विचार समोर येवून अंगाला कपडा सुटून पायाघालून जमीन सरकते. टाकीच्या कॉलमला तडे…स्लॅबचे व कॉलमच्या लोखंडी सळ्या गंजलेल्या अवस्थेत दिसून येत असतांना या टाकीत पाणी भरण्यासाठी…सोडण्यासाठी…70 वर्षाच्या तरुणाला ठेवण्यात आले असून आज पाण्याच्या टाकीची अवस्था न पाहता पाणी भरले जात असल्याचे ग्रामस्थांमधून बोलले जात आहे. पाण्याची टाकी धोकादायक अवस्थेत असून कोसळण्याच्या वाटेवर असून अखेरचे श्वास घेत असल्याचे चित्र असतांना हाळ वासियांच्या जीवाची कोणतीच काळजी प्रशासनाला राहिलेली नाही का ?टाकी एखाद्या वेळी मध्यरात्रीच्या सुमारास लगत असणाऱ्या राहत्या घरावर तसेच ये-जा करणाऱ्या तसेच कोणत्या तरी धार्मिक सप्ताहाच्या वेळी कोसळल्यावर  पाच लाखांची मदत घोषित करण्यासाठी प्रशासनाचे बेजबाबदार अधिकारी, लोकप्रतिनिधी धावत येणार का ? हे अधिकारी, लोकप्रतिनिधी गेलेले जीव परत आणणार का ?प्रशासनाला जाग येणार तरी कधी ?असा संतप्त सवाल ग्रामस्थांमधून उपस्थित होत आहे.