पनवेल शिवसत्ता टाइम्स (दिपक कांबळे,दत्ता मोकल):-
पनवेल महानगरपालिकेने वाढवलेल्या मालमत्ता कराविरोधात आज महाविकास आघाडीच्या वतीने पनवेल महानगरपालिकेवर जोरदार मोर्चा काढण्यात आला. या मोर्चात महाविकास आघाडीचे घटक पक्ष शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे),राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) आणि काँग्रेससोबत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचाही (मनसे) सहभाग होता.सकाळपासूनच मोर्चासाठी ग्रामीण भागातील नागरिक मोठ्या संख्येने पनवेलमध्ये दाखल झाले.शेतकरी, लहान व्यापारी, तसेच गाव पातळीवरील सामाजिक कार्यकर्त्यांचा उत्स्फूर्त सहभाग पाहायला मिळाला. याउलट, शहरी भागातील नागरिकांकडून मात्र या मोर्चाला अपेक्षित पाठिंबा मिळाला नाही. शहरातील अनेक भागांत नेहमीप्रमाणेच वाहतूक सुरू होती, तर काही भागात नागरिकांनी आंदोलनात सहभागी होण्यापेक्षा दूर राहणेच पसंत केले.पालिकेने नुकतीच थकबाकीदारांना दिलासा देण्यासाठी 90 टक्के शास्ती माफी जाहीर केली होती.मात्र, या निर्णयावर महाविकास आघाडीच्या नेत्यांनी तीव्र आक्षेप घेतला. “ही शास्ती माफी म्हणजे केवळ लोकांची दिशाभूल आहे. मूळ मालमत्ता करातच मोठी कपात केल्याशिवाय नागरिकांवरील आर्थिक ओझे कमी होणार नाही,असे उबाठा महानगर प्रमुख अवचित राऊत यांनी सांगितले… मोर्चादरम्यान महाविकास आघाडीच्या नेत्यांनी पालिकेच्या कर धोरणाला ‘अन्यायकारक’ आणि ‘जनतेच्या विरोधात’ असल्याचे संबोधले. तसेच, तातडीने मूळ कर रकमेवर सवलत न दिल्यास पुढील काळात आणखी तीव्र आंदोलन छेडण्याचा इशाराही देण्यात आला.मोर्चाची सांगता पालिका भवनासमोर झाली, जिथे नेत्यांनी निवेदन सादर करत आपली मागणी स्पष्टपणे मांडली.पोलिसांनी सुरक्षा व्यवस्थेसाठी मोठा बंदोबस्त तैनात केला होता. कोणताही अनुचित प्रकार घडू न देता मोर्चा शांततेत पार पडला.
या मोर्चात शिवसेना उपनेते तथा माजी आमदार सुरेन्द्रनाथ (बाळ) माने, माजी आमदार (म.वि.आ) अध्यक्ष बाळाराम पाटील, उपनेते बबनदादा पाटील, संपर्क प्रमुख प्रसाद भोईर, शिवसेना जिल्हाप्रमुख-रायगड शिरीष घरत, मावळ लोकसभा संघटक संजोग वाघेरे, शिवसेना जिल्हा सल्लागार शिरीष बुटाला, कॉंग्रेस चे जिल्हाध्यक्ष सुदाम पाटील, राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष सतीश पाटील, मनसेचे प्रवक्ते योगेश चिल्ले, शिवसेना उपजिल्हा प्रमुख भरत पाटील, उपजिल्हा प्रमुख रामदास पाटील, विधानसभा संघटक दिपक निकम, विधानसभा समन्वयक प्रदीप ठाकूर, तालुका प्रमुख संदीप तांडेल, ज्ञानेश्वर बडे, महानगर प्रमुख अवचित राऊत, महानगर संघटक गुरुनाथ पाटील, शहर प्रमुख प्रवीण जाधव, शहर प्रमुख यतीन देशमुख, शहर प्रमुख सदानंद शिर्के, शहर प्रमुख सूर्यकांत म्हसकर, शहर प्रमुख रामदास गोवारी, शहर प्रमुख प्रदीप केणी, कॉंग्रेस चे जेष्ठ नेते कॅप्टन कलावत, शेकापचे प्रकाश म्हात्रे, अॅड. विजय गडगे, आरपीआय चे अनिल नाइक, महिला आघाडीच्या उपजिल्हा संघटिका. सौ. रेवती सकपाळ, सौ. अनीता डांगरकर, सौ. भावना घाणेकर, यांच्यासह महाविकास आघाडीचे पदाधिकारी व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

