माणगाव शिवसत्ता टाइम्स (नरेश पाटील):-
सलग मुसळधार पावसामुळे काल नदीच्या पुराचे पाणी धोक्याच्या पातळीवरून वाढून खांदाड गावात घुसले आहे. सुरुवातीला पाणी खालच्या बाजूच्या शेतांमध्ये शिरले. त्यानंतर तेथून मानवी वस्तीच्या परिसरात आले. त्यातूनच जवळील तलाव भरून वाहू लागले व दक्षिण खांदाडमधील अंतर्गत रस्ते पूर्णपणे जलमय झाले.
पुढे या प्रचंड पाण्याचा प्रवाह गावातील गटारांमध्ये शिरला व तिथून थेट घरांच्या अंगणात आला. काही ठिकाणी पाण्याची पातळी एवढी वाढली आहे की घरात शिरण्यास फक्त दोन पायऱ्यांचा फरक उरला आहे.
माणगाव नगरपरिषदेकडून अधिकाऱ्यांची पथके पूरग्रस्त भागांचा आढावा घेत आहेत. दरम्यान, नागरी प्रशासनाने पूरग्रस्तांसाठी मदत व निवारा केंद्राची तयारी सुरू केली आहे. याचबरोबर स्वच्छता निरीक्षक प्रमोद मोरे आपल्या पथकासह खांदाड आदिवासी वस्तीमध्ये दाखल झाले असून तेथील नागरिकांना सुरक्षित स्थळी हलविण्याचे काम युद्धपातळीवर सुरू केले आहे.
पूरस्थिती पाहून गावकरी स्वयंस्फूर्तीने घराबाहेर पडताना दिसत आहेत. काहींना स्थानिक नागरिकांच्या मदतीने सुरक्षित ठिकाणी हलवण्यात येत आहे. तसेच रहिवासी आपल्या वाहनांना उंच ठिकाणी पार्क करताना व घरगुती सामान सुरक्षित जागी ठेवताना दिसत आहेत.
दरम्यान, मुसळधार पाऊस कायम असल्याने परिस्थिती गंभीरच आहे. त्यामुळे नागरिकांनी सतर्क राहून प्रशासन व बचाव पथकाला सहकार्य करावे, असे आवाहन करण्यात आले आहे.
दरम्यान सामाजिक कार्यकर्ते संतोष बाळा मांजरे, पोलीस पाटील नथुराम पोवार यांनी परिस्थिती वर लक्ष ठेवून पाहाणी करीत असल्याचे चित्र आमच्या प्रतिनिधी यांनी पाहिले.