अलिबाग शिवसत्ता टाइम्स (ओमकार नागावकर):-
साळाव – तळेखार महामार्गाची दुर्दशा सहा महिन्यांपासून नागरिकांचे हाल करत आहे. उखडलेला १३ किमीचा रस्ता, खड्डे, चिखल आणि अपघातांच्या धोक्यामुळे नागरिकांचे जीवन अत्यंत असह्य झाले आहे. अखेर या ढिसाळ आणि बेफिकीर कारभाराचा संताप आज ज्वालामुखीसारखा फुटला.
भर पावसातही नागरिक रस्त्यावर उतरले आणि उग्र रास्तारोको छेडला. घोषणाबाजी करत प्रशासनाला जागवण्याचा प्रयत्न केला गेला. या आंदोलनाचे नेतृत्व रायगड जिल्हा परिषदेचे विरोधीपक्ष नेते आणि शिवसेना जिल्हाप्रमुख सुरेंद्रदादा म्हात्रे यांनी केले. त्यांना उपजिल्हाप्रमुख प्रशांतदादा मिसाळ आणि युवासेना तालुकाप्रमुख किशोर काजारे यांनी साथ दिली. तब्बल २०० ते २५० संतप्त नागरिकांनी रस्त्यावर उतरून आपला आक्रोश व्यक्त केला.
सुरेंद्रदादा म्हात्रे यांनी स्पष्ट केले की, MSIDC आणि कंत्राटदाराच्या ढिसाळ कारभाराला नागरिक माफ करणार नाहीत. मागण्या मान्य न झाल्यास नवरात्रीपूर्वी आणखी भव्य आणि आक्रमक मोर्चा उभारला जाईल. आंदोलनादरम्यान MSIDC चे मुख्य अधिकारी एम.के. सिंग यांना निवेदन देण्यात आले असून, गणेशोत्सवापूर्वी २३ ऑगस्टपर्यंत रस्त्याचे काम पूर्ण करण्याची हमी देण्यात आली आहे.
नागरिकांनी स्पष्ट इशारा दिला आहे की हा रास्तारोको फक्त एक सुरुवात आहे. जर काम वेळेत पूर्ण झाले नाही, तर जनआक्रोश आणखी भडकणार आहे आणि त्याची संपूर्ण जबाबदारी शासन आणि कंत्राटदारावर राहील.