उरण शिवसत्ता टाइम्स (प्रवीण पाटील):-
चार दिवसांपासून सुरु असलेल्या मुसळधार पावसामुळे उरण-पनवेल राष्ट्रीय महामार्गाला अक्षरशः नद्यांचे स्वरूप आले आहे. तीन ते चारफुट पाणी साचल्याने दहा मिनिटांचा प्रवास करण्यासाठी नागरिकांना तब्बल तीन ते चार तासांचा त्रास सहन करावा लागला. आधीच दररोजच्या वाहतूक कोंडीने होरपळणाऱ्या उरणकरांच्या संतापाचा आज कडेलोट झाला.
गणेशोत्सव जवळ आल्याने भाविक खरेदीसाठी मुंबई-पनवेलकडे निघाले होते; मात्र महामार्गावर तीन-चार फुट पावसाचे पाणी साठल्याने गाड्यांच्या रांगा दोन ते तीन किलोमीटर लांगला होता.प्रवास छळछावणी ठरला. दररोज टोल वसूल करूनही पावसांतच रस्ते पोखरले. खड्ड्यांमुळे नागरिक बळी पडतात, अपघात होतात; पण जबाबदारी उचलण्याऐवजी उलट पीडितांवरच गुन्हे दाखल होतात, अशी जनतेची तीव्र नाराजी आहे.
रस्ते व उड्डाणपूल उभारणीचे जनक म्हणून नावाजलेले केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या विकास मॉडेलची पोलखोल उरण-पनवेल,उलवे नोड हायवेवर झाली आहे. जलमय रस्त्यावर गाड्या अडकल्या, प्रवाशांचा श्वास गुदमरला आणि जनता संतप्त झाली. ” हा विकास की अधोगती ? धनदांडग्यांच्या सुखसोयींसाठी महामार्ग की सामान्यांसाठी त्रास?” असा सवाल नागरिकांनी उपस्थित केला आहे.
शासन, ठेकेदार आणि नेतेमंडळींनी मौन धारण केले असले तरी गडकरींनो, हाच का तुमचा विकास?असा थेट प्रश्न जनतेकडून विचारला जात आहे.