अलिबाग शिवसत्ता टाइम्स (धनंजय कवठेकर):-
रायगड जिल्ह्यात आजही पावसाची संततधार सुरू आहे. जोर कमी झाला असला तरी अधून मधून पावसाच्या हलक्या ते मध्यम सरी बरसत आहेत. महाडच्या सावित्री नदीची पाणी पातळी कमी झाल्याने महाडकरांनी सुटकेचा निःश्वास सोडला आहे. मात्र माणगाव मधील पाणी अद्याप ओसरलेले नाही.माणगावात बामणोली रोडवर अजूनही पाणी साचले असून नागरिकांनी उभी करून ठेवलेली वाहने पाण्यात बुडाली आहेत. हवामान खात्याने आज जिल्ह्यासाठी पावसाचा रेड अलर्ट दिल्याने प्रशासन सतर्क आहे. सर्व यंत्रणांना सज्ज राहण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. जिल्ह्यातील शाळा महाविद्यालयांना सुटी देण्यात आली आहे. आज सलग सहाव्या दिवशी पावसाची संततधार सुरू असली तरी रायगड जिल्ह्यातील स्थिती धोकादायक नाही. नागोठणे, महाड इथले पुराचे पाणी देखील ओसरले आहे. नद्यांच्या पाणी पातळीत देखील कालच्या तुलनेत घट झाली आहे. सावित्री आणि अंबा नद्या इशारा पातळीच्या खालून वाहत आहेत तर रोहा इथली कुंडलिका नदी इशारा पातळी वरून वाहत आहे.