नागोठणे शिवसत्ता टाइम्स (अनिल पवार):-
गेल्या दोन-तीन दिवसांपासून सुरु असलेल्या मुसळधार पावसामुळे अंबा नदीला यंदा तिसऱ्यांदा पूर आला असून दुपारी नदीने धोक्याची पातळी ओलांडली. यामुळे नागोठणे शहरासह परिसरातील जनजीवन विस्कळीत झाले आहे.
पूराचे पाणी एसटी बसस्थानक, वन विभाग कार्यालयासमोर व हॉटेल लेक व्ह्यू समोरील मुख्य रस्त्यावर शिरले. त्यामुळे एसटी बससेवा विस्कळीत झाली असून शहरात येणाऱ्या गाड्या तात्पुरत्या स्वरूपात मुंबई–गोवा महामार्गावरील प्राथमिक आरोग्य केंद्रासमोर थांबवण्यात येत आहेत. मिनी डोअर रिक्षा सेवा देखील ठप्प झाली आहे.
पूरामुळे सखल भागातील दुकानदारांना आपला माल सुरक्षित स्थळी हलवावा लागला. विद्यार्थ्यांबरोबरच बाजारात खरेदीसाठी आलेल्या नागरिकांचीही मोठी गैरसोय झाली. दरम्यान, अनुचित प्रकार घडू नये यासाठी सरपंच सुप्रिया संजय महाडिक यांच्या मार्गदर्शनाखाली ग्रामपंचायत प्रशासन सतर्क राहिले. नागरिकांनी नदीकाठावर वा पूरग्रस्त भागात न जाण्याचे आवाहन करण्यात आले आहे. तसेच सहाय्यक पोलिस निरीक्षक सचिन कुलकर्णी यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिसांनी एसटी बसस्थानक व सखल भागात गस्त ठेवून परिस्थितीवर नियंत्रण ठेवले आहे.