पेणच्या रामवाडीत रॉयल ग्रँड्यूयर इमारत धोक्यात… इमारतीमधील रहिवाशांवर मृत्यूची टांगती तलवार…

0
10

पेण शिवसत्ता टाइम्स (धम्मशील सावंत):- 

महाडमधील तारिक गार्डन दुर्घटनेची पुनरावृत्ती पेण तालुक्यातील रामवाडी येथे होण्याची भीती निर्माण झाली आहे. रॉयल ग्रँड्यूयर या इमारतीतील A व B विंगचे बांधकाम निकृष्ट दर्जाचे झाल्याचा गंभीर आरोप येथील सदनिका धारकांनी केला आहे. या इमारतीत शंभर सदनिका असून सुमारे ६०० हून अधिक नागरिक वास्तव्यास आहेत.

अवघ्या चार वर्षांतच या इमारतीची दुरावस्था इतकी भीषण झाली आहे की नागरिक जिव मुठीत घेऊन राहतात. इमारतीचे प्लॅस्टर वारंवार कोसळते, भिंतींना मोठे तडे गेले असून तळमजल्यावरील तब्बल २८ पिलरला भेगा पडल्या आहेत. मुख्य पिलर पोकळ व कमकुवत असल्याने इमारतीचे भवितव्य अंधारमय झाले आहे.

याशिवाय या इमारतीकडे जाण्यासाठी योग्य रस्ता नसल्याने नागरिकांच्या हालअपेष्टा अधिकच वाढल्या आहेत. वारंवार शासन व प्रशासनाकडे लेखी तक्रारी करूनही कोणतीही कार्यवाही न झाल्याने रहिवाशी संतप्त झाले आहेत.
रहिवाशांनी स्पष्ट इशारा दिला आहे की, दुर्घटना झाल्यानंतर जीवाची किंमत कवडीमोल देण्यापेक्षा आधीच ठोस पावले उचलावीत. अन्यथा न्याय न मिळाल्यास आबालवृद्धांसह महिला व लहान मुलांना घेऊन पेण नगर परिषदेवर मोर्चा काढण्यात येईल.