कर्जत शिवसत्ता टाइम्स (संदेश साळुंके):-
कोल्हारे कर्जत येथील केवळ विकासकामांवर भर न देता सामाजिक जाणीव जपत सार्वजनिक हिताच्या दिशेने कृतीशील राहणारे महेश विरले आणि जोस्त्ना विरले हे दाम्पत्य पुन्हा एकदा चर्चेच्या केंद्रस्थानी आले आहे. त्यांनी कोल्हारे ग्रामपंचायत हद्दीतील विविध सार्वजनिक ठिकाणी वयोवृद्ध आणि ग्रामस्थांच्या सोयीसाठी स्वखर्चाने लोखंडी बाकडे (बेंच) बसवले आहेत.हा उपक्रम कोणत्याही सरकारी निधीशिवाय, राजकीय प्रेरणेशिवाय किंवा प्रसिद्धीच्या हव्यासाशिवाय, केवळ समाजहिताच्या भावनेतून राबवला गेला आहे. गावातील सोसायट्यांमध्ये, प्रमुख चौकांमध्ये आणि वर्दळीच्या ठिकाणी या बाकड्यांची स्थापना करण्यात आली आहे. “वृद्ध नागरिकांना बसण्यासाठी जागा न मिळाल्याने अनेक वेळा त्रास सहन करावा लागतो. थकलेल्या पायांना थोडी विश्रांती मिळावी, यासाठी हा प्रयत्न केला आहे,” असे महेश विरले यांनी सांगितले.
विरले दाम्पत्य यापूर्वीही समाजासाठी विविध उपक्रमांमध्ये सक्रिय राहिले आहे. महेश विरले हे स्थानिक पातळीवरील सामाजिक कार्यांमध्ये सातत्याने योगदान देत असून, जोस्त्ना विरले यांचा सहभाग महिला सक्षमीकरण, आरोग्य जनजागृती आणि शिक्षणविषयक उपक्रमांमध्ये लक्षणीय आहे. गरीब विद्यार्थ्यांना शालेय साहित्य वाटप, वृक्षारोपण, स्वच्छता मोहिमा, कोविड काळात सॅनिटायझर आणि मास्क वाटप हे त्यांचे काही उल्लेखनीय उपक्रम आहेत.
या लोखंडी बाकड्यांचा लाभ आता अनेक वयोवृद्ध आणि प्रवासी ग्रामस्थांना मिळणार असून, त्यांच्या या सामाजिक कार्याची दखल ग्रामस्थांनीही घेतली आहे. “कधीही मागणी न करता, निःस्वार्थ भावनेने केलेली ही सेवा खरोखरच प्रेरणादायी आहे,” असे कोल्हारे ग्रामपंचायतीचे पदाधिकारी आणि नागरिकांनी सांगितले. कार्यक्रमावेळी ग्रामपंचायतीचे सदस्य, पदाधिकारी व स्थानिक नागरिक उपस्थित होते.
गावासाठी काहीतरी सकारात्मक करायचे असेल, तर मोठ्या निधीची गरज नसते, मनात इच्छा आणि कृतीत प्रामाणिकपणा असला की कार्य घडतेच,” हा संदेश विरले दाम्पत्याने त्यांच्या कृतीतून पुन्हा एकदा अधोरेखित केला आहे. समाजात सकारात्मकता निर्माण करणाऱ्या अशा उपक्रमांचे सध्या सर्वत्र कौतुक होत असून, अशा व्यक्ती समाजासाठी खर्या अर्थाने दीपस्तंभ ठरतात.