महाड शिवसत्ता टाइम्स (रेश्मा माने):-
महाड शहरातील प्रसिद्ध सिद्धी स्वीट या मिठाई दुकानातील समोसे खाल्ल्यानंतर पत्रकार जुनेद तांबोळी यांच्या कुटुंबीयांना उलटी व जुलाबाचा त्रास झाल्याची घटना समोर आली आहे. यानंतर संबंधित दुकानदाराकडे चौकशी केली असता, उलटपक्षी धमकावण्याचा प्रकार झाल्याची तक्रार महाड शहर पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, पत्रकार जुनेद तांबोळी यांच्या पत्नीने १६ ऑक्टोबर रोजी सिद्धी स्वीट येथून समोसे खरेदी केले. घरात हे समोसे खाल्ल्यानंतर ते खराब लागल्याचे लक्षात आले, मात्र त्याआधीच काहींनी ते खाल्ले होते. यामुळे पत्रकार तांबोळी यांच्या पत्नी आणि आई यांना पोटदुखी व जुलाबाचा त्रास झाला. ही बाब दुकानात जाऊन सांगितल्यावरही दुकानदाराने “चुकून झाले असेल” असे दुर्लक्षी उत्तर दिले. त्यानंतर संबंधित दुकानदार व त्याच्या सहकाऱ्यांकडून तांबोळी यांना भ्रमणध्वनीद्वारे धमकावल्याचा प्रकार घडला असल्याची माहिती समोर आली आहे. दरम्यान, या घटनेनंतर नागरिकांनी महाड शहरातील तसेच परिसरातील सर्व मिठाई व फास्टफूड दुकानदारांची तपासणी करण्याची मागणी अन्न व औषध प्रशासनाकडे केली आहे. ग्रामीण भागातील अनेक नागरिक महाड शहरात खरेदीसाठी येतात. त्यांना खाद्यपदार्थांच्या गुणवत्तेबाबत व एक्सपायरी डेटबाबत माहिती नसल्याने अनेक दुकानदार या भोळेपणाचा फायदा घेत असल्याचा आरोप स्थानिकांकडून करण्यात येतो. मागील वर्षी देखील महाडमधील एका नामांकित स्वीट व्यवसायिकावर खराब खाद्यपदार्थ विक्री प्रकरणी कारवाई झाली होती. तरीदेखील अन्न प्रशासनाने ठोस भूमिका घेतली नाही, अशी नागरिकांची नाराजी आहे.दिवाळीच्या पार्श्वभूमीवर मिठाई विक्री वाढत असताना खराब मावा किंवा साठवलेला खवा वापरून मिठाई तयार केली जात असल्याच्या तक्रारी अनेकांकडून येत आहेत. त्यामुळे अन्न व औषध प्रशासनाने सर्व स्वीट दुकानदारांवर तातडीने तपासणी मोहिम राबवावी, अशी मागणी होत आहे.