भावंडे भेटली,पण राजकारणात प्रामाणिकपणा जनता ठरवेल गोगावलेंचा टोला… अनेक वर्षांच्या कटुतेनंतर राज आणि उद्धव ठाकरे एकाच मंचावर… 

0
4

रायगड शिवसत्ता टाइम्स (वार्ताहर):-

दिवाळीचा उत्सव म्हणजे प्रकाश,आनंद आणि भेटीगाठींचं पर्व.पण यंदाच्या दिपोत्सवात सर्वाधिक चर्चेत राहिली ती ठाकरे बंधूंची अनपेक्षित भेट.अनेक वर्षांच्या दुराव्यानंतर राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे हे दोघे एकाच मंचावर दिसल्याने महाराष्ट्राच्या राजकारणात मोठी खळबळ उडाली आहे.शिवबंधन पुन्हा जुळणार का?हा प्रश्न आता सर्वत्र चर्चेचा विषय ठरला आहे. मुंबईत झालेल्या दिपोत्सवाच्या कार्यक्रमात ठाकरेबंधू एकत्र आल्याचं दृश्य पाहून कार्यकर्त्यांपासून ते जनतेपर्यंत सर्वांना आश्चर्याचा धक्का बसला.अनेक वर्षे एकमेकांपासून दूर राहिलेले, राजकीय आणि वैयक्तिक मतभेदांमुळे दोन वेगळ्या मार्गाने जाणारे ठाकरे बंधू पुन्हा एकत्र येतील का,अशी चर्चा आता रंगू लागली आहे.या घटनेवर रोजगार हमी योजना मंत्री भरत गोगावले यांनी मात्र थेट टीका करत प्रतिक्रिया दिली.ते दोघे भाऊ आहेत, हे खरं;पण सध्याच्या परिस्थितीत त्यांच्याकडे दुसरा पर्याय उरलेला नाही,” असं ते म्हणाले. त्यांनी पुढे सांगितलं,कालपर्यंत एकमेकांवर टीका करणारे आता एकत्र येतातयेत, हेच राजकारणाचं वास्तव आहे. राजकारणात कायमस्वरूपी मित्र किंवा शत्रू नसतात, परिस्थिती आणि स्वार्थ यावरच सर्व समीकरणं ठरतात.गोगावले यांनी हेही नमूद केलं की, सध्या दोन्ही पक्ष म्हणजे उद्धव ठाकरे यांची शिवसेना (उद्धव गट) आणि राज ठाकरे यांची महाराष्ट्र नवनिर्माण सेना हे दोन्ही संघटनात्मकदृष्ट्या कमकुवत झाले आहेत. कार्यकर्त्यांमध्ये संभ्रम आहे, आणि जनाधार घटत चालला आहे. अशा वेळी ठाकरे बंधूंचं एकत्र येणं ही दोन्ही पक्षांसाठी राजकीय अस्तित्व वाचवण्याची रणनीती असू शकते.दिपोत्सवातील ही भेट काहींना केवळ भावनिक क्षण वाटली. शेवटी दोघेही भाऊ आहेत, दिवाळीचा सण एकत्र साजरा करणं हे स्वाभाविक आहे, असं म्हणणाऱ्यांची संख्या कमी नाही. पण राजकीय निरीक्षकांच्या मते, ही भेट केवळ भावनिक नसून भविष्यातील सत्ता समीकरणांच्या शोधाचं प्रारंभिक पाऊल असू शकतं. आगामी विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर मनसे-शिवसेना (उद्धव गट) एकत्र आल्यास भाजप-शिंदे युतीसाठी नवी डोकेदुखी निर्माण होऊ शकते, अशी चर्चा रंगली आहे. ठाकरे बंधू एकत्र आले तर मराठी मत पुन्हा एकवटू शकतं,असा राजकीय अंदाज वर्तवला जातो.गोगावले यांनी मात्र शेवटी टोला मारत सांगितलं,सणाच्या निमित्ताने भावंडं भेटली, हे ठीक आहे…पण राज्याच्या हितासाठी राजकारणाच्या रंगमंचावर कोण किती प्रामाणिक आहे, हे जनता ठरवेल.दिवाळीच्या प्रकाशात उमटलेली ही ठाकरेबंधूंची भेट महाराष्ट्राच्या राजकारणात नवा अध्याय सुरू करेल का ?हा प्रश्न सध्या राज्यातील सर्वांच्या चर्चेच्या केंद्रस्थानी आहे.