मुंबई शिवसत्ता टाइम्स (वार्ताहर):-
महाराष्ट्रातील महानगरपालिका आणि स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांपूर्वी राज्यातील राजकीय समीकरणात मोठा बदल झाला आहे. अनेक दिवसांपासून सुरु असलेल्या चर्चांना पूर्णविराम देत अखेर भाजप, शिवसेना (एकनाथ शिंदे गट) आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष (अजित पवार गट) यांनी एकत्रितपणे निवडणूक लढवण्याचा निर्णय जाहीर केला आहे.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांची नागपुरात झालेली महत्त्वपूर्ण बैठक निर्णायक ठरली. या बैठकीत तिन्ही पक्षांनी एकत्रित लढण्याची रणनीती ठरवली असून, महापालिका ते जिल्हा परिषदपर्यंत सर्व निवडणुका महायुती एकत्र येऊन लढवणार आहेत.
भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी स्पष्ट केले की “महायुती आता स्थानिक स्वराज्य निवडणुकांसाठी पूर्ण तयारीत आहे. सीट शेअरिंगपासून ते प्रचाराची रणनीतीपर्यंत प्रत्येक गोष्ट तिन्ही पक्ष संयुक्तपणे ठरवतील.”
मुंबई महानगरपालिका (BMC) सोबतच पुणे, ठाणे, नाशिक, नागपूर, कल्याण-डोंबिवली यांसारख्या मोठ्या महानगरपालिकांमध्ये महायुतीचे अस्तित्व प्रबळ करण्याचा प्रयत्न तिन्ही पक्ष करत आहेत. तांत्रिक समिती गठीत करण्यात आली असून त्यावर सीट शेअरिंगची अंतिम आखणी होणार आहे.
या निर्णयामुळे महाराष्ट्रातील राजकीय रणभूमीवर मोठी उलथापालथ झाल्याचे स्पष्ट झाले आहे. महायुतीची एकत्र निवडणूक रणनीती विरोधकांसाठी मोठं आव्हान ठरणार असून महानगरपालिका निवडणुकीची लढत आता अधिकच रंगतदार होणार आहे. आता महानगरपालिका बिगुल वाजला आहे आणि महाराष्ट्रातील महानगरपालिका निवडणुकीची खरी लढाई सुरू झाली आहे!

