रोहा शिवसत्ता टाइम्स (दीप वायडेकर):-
रोहा नगरपरिषदेच्या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसने (अजित पवार गट) आपला बालेकिल्ला राखत दणदणीत विजय संपादन केला आहे. नगराध्यक्षपदाच्या अत्यंत प्रतिष्ठेच्या निवडणुकीत राष्ट्रवादीच्या वनश्री समीर शेडगे यांनी मोठ्या मताधिक्याने विजय मिळवत रोह्याच्या प्रथम नागरिक होण्याचा मान मिळवला आहे.
राष्ट्रवादीची जोरदार मुसंडी एकूण १० प्रभागांपैकी बहुतांश जागांवर राष्ट्रवादीच्या उमेदवारांनी विजय मिळवत विरोधकांना धोबीपछाड दिली आहे. विशेष म्हणजे प्रभाग क्रमांक २ ब मधून राजेंद्र जैन यांची बिनविरोध निवड झाली असून, इतर प्रभागांमध्येही राष्ट्रवादीच्या उमेदवारांनी आपली ताकद दाखवून दिली आहे.
राष्ट्रवादीच्या या झंझावातात शिवसेनेला केवळ एका जागेवर (प्रभाग ९ अ – सुप्रिया जाधव) आणि भारतीय जनता पक्षाला एका जागेवर (प्रभाग ९ ब – रोशन चाफेकर) यश मिळाले आहे. इतर सर्व १८ जागांवर राष्ट्रवादीने आपले वर्चस्व सिद्ध केले आहे.
या विजयानंतर रोहा शहरात राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी गुलालाची उधळण करत आणि फटाक्यांच्या आतषबाजीत मोठा जल्लोष साजरा केला. विकासाच्या मुद्द्यावर आणि स्थानिक नेतृत्वावर विश्वास ठेवून मतदारांनी हा कौल दिल्याची भावना नवनिर्वाचित नगराध्यक्षा वनश्री शेडगे यांनी व्यक्त केली आहे.

