राणी माँ यांच्या आशीर्वादाने नेरळमध्ये ‘खेळ रंगला पैठणीचा’ रंगतदार…

0
2

कर्जत शिवसत्ता टाइम्स (संदेश साळुंके):-

             राणी माँ यांच्या आशीर्वादाने नेरळमध्ये ‘खेळ रंगला पैठणीचा’; महिलांचा उत्स्फूर्त जल्लोष नेरळ, दि.  महिलांच्या सक्रिय सहभागातून सामाजिक संवाद, मनोरंजन आणि सशक्तीकरण यांची प्रभावी सांगड घालणारा ‘खेळ रंगला पैठणीचा’ हा लोकप्रिय होम मिनिस्टर कार्यक्रम नेरळ येथे काल रात्री प्रचंड उत्साहात पार पडला. नेरळसह परिसरातील महिलांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहत कार्यक्रमाला अभूतपूर्व प्रतिसाद दिला. प्रत्येक सहभागी महिलेला साडी भेट देण्यात आल्याने कार्यक्रमाचे आकर्षण अधिकच वाढले.

या भव्य उपक्रमाचे आयोजन डॉ. शिल्पा ललित जैन (राणी माँ) शुभम ज्वेलर्स, पार्श्वनाथ गोल्ड यांच्या सौजन्याने तसेच जिल्हा प्रमुख–जिल्हा बांधकाम कामगार सेना यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आले होते. दिवंगत ललित शेषमल जैन (पप्पू शेठ) यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ आयोजित या कार्यक्रमातून सामाजिक बांधिलकीचे दर्शन घडले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी सचिन भाऊ इंगळे (सनी भाऊ) कोकण प्रमुख, महाराष्ट्र राज्य बांधकाम कामगार सेना तसेच शिवसेना जिल्हा परिषद, नेरळ विभाग यांचे मोलाचे सहकार्य लाभले.

कार्यक्रमास कॅबिनेट मंत्री भरतशेठ गोगावले, आमदार महेंद्र थोरवे, शिवसेना नेत्या मीनाताई कांबळे तसेच शांताराम इंगळे यांची प्रमुख उपस्थिती होती. याशिवाय सामाजिक कार्यकर्ते सदानंद बाळकृष्ण जाधव, आबासाहेब पवार, अंकुश दाभणे, केतन पोतदार यांनीही उपस्थित राहून कार्यक्रमाची शोभा वाढवली.

महिलांसाठी विविध फेऱ्यांतील खेळ, प्रश्नोत्तरे, उखाणे तसेच सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. महिलांनी आत्मविश्वासाने सहभाग घेत संपूर्ण कार्यक्रमात उत्साहाची लाट निर्माण केली. त्यांच्या टाळ्यांच्या गजरात छत्रपती शिवाजी महाराज मैदान आनंदी आणि उत्सवमय वातावरणाने भारून गेले. स्पर्धेत प्रथम क्रमांकास स्कुटी व पैठणी, द्वितीय क्रमांकास एलईडी टीव्ही व पैठणी, तृतीय क्रमांकास वॉशिंग मशीन व पैठणी, चतुर्थ क्रमांकास वॉटर फिल्टर व पैठणी तर पाचव्या क्रमांकास मिक्सर व पैठणी देण्यात आली. उर्वरित सर्व सहभागी महिलांनाही आकर्षक पैठणी देऊन मान्यवरांच्या हस्ते गौरविण्यात आले.

कार्यक्रमाचे विशेष आकर्षण ठरली हिंदवी पाटील यांची जोशपूर्ण लावणी, जिने उपस्थितांचे लक्ष वेधून घेतले. सुप्रसिद्ध गायक व निवेदक हरीश मोकल यांनी कार्यक्रमाचे प्रभावी निवेदन केले. आयोजनात सुरेश टोकरे (माजी रा. जि. प. अध्यक्ष), ज्ञानेश्वर भगत तसेच नेरळ येथील महिला पदाधिकारी उमा खडे, गीतांजली देशमुख व असंख्य कार्यकर्त्यांचे मोलाचे सहकार्य लाभले.

समारोपप्रसंगी मान्यवरांनी महिलांसाठी अशा सामाजिक व सांस्कृतिक उपक्रमांची नितांत गरज असल्याचे प्रतिपादन केले. महिलांना व्यक्त होण्यासाठी व्यासपीठ मिळाल्यास कुटुंब, समाज आणि संस्कृतीत सकारात्मक परिवर्तन घडते, असे मत व्यक्त करण्यात आले. एकूणच ‘खेळ रंगला पैठणीचा’ हा कार्यक्रम महिलांच्या सशक्त सहभागातून सामाजिक जाणीव वृद्धिंगत करणारा आणि प्रेरणादायी ठरला.