रवींद्र चव्हाण यांच्या शुभ हस्ते महिला कौशल्य सक्षमीकरण व रोजगाराभिमुख प्रशिक्षण केंद्राचे उद्घाटन…

0
4

माणगाव शिवसत्ता टाइम्स (नरेश पाटील) :- 

राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष (शरदचंद्र पवार) रायगड व युवा परिवर्तन सामाजिक संस्थांच्या संयुक्त विद्यमाने राबविण्यात येत असलेल्या महिला कौशल्य व रोजगाराभिमुख प्रशिक्षण उपक्रमाचे उद्घाटन रविवारी, दि. ४ जानेवारी २०२६ रोजी ढालघर येथील महिला बचतगट सभागृहात पार पडले. पक्षाचे रायगड जिल्हाध्यक्ष मा रविंद्र चव्हाण यांच्या प्रमुख उपस्थितीत हा सोहळा संपन्न झाला.

उद्घाटन सोहळ्याच्या स्वागतास फटाक्यांच्या आतषबाजीत व पारंपरिक विधींनी केले गेले. यानंतर कौशल्य प्रशिक्षण केंद्राचे उद्घाटन फीत कापून सन्माननिय रवींद्र चव्हाण यांच्या शुभहस्ते करण्यात आले तसेच छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळा आणि ज्ञान ज्योती सावित्री भाई फुले यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण चव्हाण यांनी केले या नंतर उपस्थित मान्यवर यांनी दीपप्रज्वलन केले.  कार्यक्रमाची प्रस्तावना आयोजकांच्या वतीने करण्यात आली, त्यानंतर प्रमुख पाहुणे रवींद्र चव्हाण आणि ईतर उपस्थित मान्यवरांचा सत्कार पार पडला

या वेळी व्यासपीठावर राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष, (शरद पवार) रायगड जिल्हा अध्यक्ष आदरणीय रवींद्र चव्हाण, सचिव श्रीहर्ष कांबळे, सदस्य चव्हाण, माणगाव ता. अध्यक्ष राजू रोडेकर, म्हसळा ता. अध्यक्ष आकाश पेरवी आणि ढालघर गावचे माजी सरपंच सौं.शकुंतला दीपक तेटगुरे विराजमान झाले होते.

दरम्यानाचा काळात उद्घाटन प्रसंगी बोलताना रायगड जिल्हाध्यक्ष रविंद्र चव्हाण यांनी सांगितले की, क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांच्या कार्यामुळेच महिलांना शिक्षणाचा अधिकार मिळाला आणि आज आपला देशातील सर्वोच्च घटनात्मक पदांपर्यंत महिला पोहोचू शकल्या आहेत. पूर्वी महिलांना शिक्षण व स्वातंत्र्य नाकारले जात असे; मात्र आज महिला कौशल्यसंपन्न होण्यासाठी स्वतः पुढे येत आहेत, हे समाजातील सकारात्मक परिवर्तनाचे द्योतक आहे असे सांगितले.

तसेच कार्यक्रमास उपस्थित सर्वांचे स्वागत करत, चव्हाण यांनी या उपक्रमासाठी पुढाकार घेतलेल्या सामाजिक संस्था व राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या पदाधिकाऱ्यांचे अभिनंदन केले. ज्ञान कोणीही हिरावून घेऊ शकत नाही, असे सांगत त्यांनी महिलांनी रोजगाराभिमुख कौशल्य प्रशिक्षण घेऊन स्वावलंबी व्हावे, असे आवाहन केले. महिलांना केवळ मदतीवर अवलंबून न ठेवता त्यांना आत्मनिर्भर बनविणे, हाच या उपक्रमाचा खरा उद्देश असल्याचे त्यांनी नमूद केले.

हा सामाजिक उपक्रम पक्षाचे सर्वोच्च नेते मा. शरद पवार व लोकसभेच्या खा. संसद रत्न पुरस्कारप्राप्त मा. सुप्रिया सुळे यांच्या प्रेरणेतून साकारत असल्याचे त्यांनी सांगितले. महिलांच्या सर्वांगीण विकासावर भर देताना चव्हाण म्हणाले की, एक महिला सक्षम झाली तर घर, गाव, शहर, तालुका, जिल्हा, राज्य आणि अखेर संपूर्ण राष्ट्राचा विकास घडतो.

या उपक्रमामागे कोणताही राजकीय स्वार्थ नसल्याचे स्पष्ट करत त्यांनी सांगितले की, ‘लाडकी बहीण’ योजनांप्रमाणे मतांच्या अपेक्षेने हा उपक्रम राबविला जात नाही. महिलांना मदत देऊन त्याबदल्यात मतांची अपेक्षा ठेवणारी भूमिका आमची नाही, असे त्यांनी ठामपणे सांगितले. या उपक्रमांतर्गत लाभार्थी महिलांची संख्या ४०० असो किंवा ६००, आम्ही हा उपक्रम आठणार नाही तसेच हटणार नाही, अर्धवट सोडणार नाही, तर तो पूर्ण यशस्वी करून दाखवू, असा निर्धार त्यांनी व्यक्त केला.

या दरम्यान उच्च शिक्षण पूर्ण केलेल्या तरुणींनाही व्यावसायिक व करिअरपूरक कौशल्य प्रशिक्षण स्वीकारण्याचे आवाहन करत, चव्हाण यांनी सांगितले की, कौशल्याधारित रोजगार हाच आजच्या काळातील खरा सशक्तीकरणाचा मार्ग आहे. कार्यक्रमाच्या शेवटी त्यांनी या रोजगार कौशल्य अभ्यासक्रमात प्रवेश घेतलेल्या सर्व महिलांना शुभेच्छा दिल्या व त्यांच्या उज्ज्वल व स्वावलंबी भविष्यासाठी सदिच्छा व्यक्त करून आपला भाषण संपविले.

दरम्यान युवा परिवर्तन एरिया मॅनेजर आकाश पेरवी, रोजगार मार्गदर्शक श्रीमती मिताली तेटगुरे, श्रीमती शगुफ्ता माटवणकर, श्रीमती निलाक्षी मुंडे, तसेच टेलरिंग प्रशिक्षक श्रीमती संचिता तेटगुरे, सरपंच, युवा कौशल्य विभागाचे पदाधिकारी व पक्षाचे इतर कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. स्थानिक युवक-युवतींना रोजगाराभिमुख प्रशिक्षण उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने हे कौशल्य प्रशिक्षण केंद्र सुरू करण्यात आले असल्याचे यावेळी स्पष्ट करण्यात आले.