अंगणवाडी सेविका ते वकील; आता एलएलएमपर्यंत यशाची झेप जिवीता पाटील यांचा प्रेरणादायी जीवनप्रवास… 

0
3

अलिबाग शिवसत्ता टाइम्स (वार्ताहर):- 

ऐन तारुण्यात पतीचे छत्र हरपल्यानंतर पदरात असलेल्या लेकासह जीवनाशी दोन हात करत शिक्षण, नोकरी आणि समाजकार्य या तिन्ही आघाड्यांवर यशस्वी वाटचाल करणाऱ्या अंगणवाडी सेविका जिवीता पाटील यांनी आणखी एक महत्त्वाचा टप्पा गाठला आहे. एलएलबी परीक्षा प्रथम श्रेणीत उत्तीर्ण झाल्यानंतर आता त्यांनी एलएलएम (Master of Laws) ही पदव्युत्तर कायद्याची परीक्षा देखील यशस्वीरित्या उत्तीर्ण केली आहे.

गेल्या 14 वर्षांपासून अंगणवाडी सेविका म्हणून कार्यरत असलेल्या जिवीता पाटील यांच्या नावापुढे ‘ॲडव्होकेट’ ही ओळख लागल्यानंतर आता एलएलएम पदवीधारक म्हणून त्यांची ओळख अधिक भक्कम झाली आहे. त्यांच्या या यशामुळे रायगड जिल्ह्यातील अंगणवाडी सेविका व महिला वर्गामध्ये अभिमान आणि आनंदाचे वातावरण पसरले आहे.

जिवीता पाटील यांचे वय अवघे 21 वर्ष असताना पतीचे निधन झाले. एक वर्षाच्या मुलाला सोबत घेवून त्यांनी संघर्षमय जीवनाची सुरुवात केली. एकात्मिक बालविकास सेवा प्रकल्प, अलिबाग अंतर्गत चिखली विभागातील नवीन वाघविरा गावात अंगणवाडी सेविका म्हणून कार्यरत असताना त्यांनी शिक्षणाची कास कधीही सोडली नाही. त्यांच्या सासू मनोरमा हरिश्चंद्र पाटील यांच्या मोलाच्या सहकार्यामुळे व पाठिंब्यामुळे हा प्रवास शक्य झाला.

आर्थिक अडचणी असतानाही भाजी व्यवसाय करत त्यांनी को. ए. सो. लक्ष्मी शालिनी कला, विज्ञान व वाणिज्य महिला महाविद्यालय, पेझारी-पोयनाड येथून प्रथम श्रेणीत बी.ए. पदवी संपादन केली. त्यानंतर वाशी येथील एच.बी.बी.एड कॉलेजमधून बी.एड, तर मुंबई विद्यापीठातून एम.ए., एम.ए. एज्युकेशन, एम.फिल या पदव्युत्तर पदव्या प्राप्त केल्या. टिळक महाराष्ट्र विद्यापीठ, पुणे (खारघर शाखा) येथून एम.एस.डब्ल्यू पदवी प्रथम श्रेणीत मिळवली.

यानंतर को. ए. सो. ॲड. दत्ता पाटील लॉ कॉलेज, अलिबाग येथून एलएलबी परीक्षा प्रथम श्रेणीत उत्तीर्ण होत कायद्याच्या क्षेत्रात प्रवेश केला. त्यानंतरही न थांबता त्यांनी एलएलएम परीक्षा देखील यशस्वीरित्या उत्तीर्ण करून आपल्या शैक्षणिक वाटचालीत आणखी एक सुवर्णपान जोडले आहे. सामाजिक कार्याची विशेष आवड असलेल्या जिवीता पाटील यांनी तेजस्विनी फाऊंडेशनच्या माध्यमातून विविध उपक्रम राबविले आहेत. जिल्हा न्यायालय, अलिबाग येथील विधी सेवा प्राधिकरणात न्यायाधीश जयदीप मोहिते यांच्या मार्गदर्शनाखाली त्यांनी अनेक जाणीव जागृती कार्यक्रम राबवून शासनाच्या मोफत योजनांचा लाभ सर्वसामान्यांपर्यंत पोहोचवला आहे. कोरोना काळातही त्यांनी उल्लेखनीय कार्य केले.

आजतागायत त्यांनी 47 मुलींचे शिक्षण दत्तक घेतले असून पुढील काळात विधवा, परितक्त्या व निराधार महिलांसाठी रोजगार मार्गदर्शन व संधी उपलब्ध करून देण्याचा त्यांचा मानस आहे. भविष्यात सामाजिक कार्यातून एलजीबीटी समाजाच्या समस्या या विषयावर पीएचडी करण्याचाही त्यांचा संकल्प आहे. अंगणवाडी सेविका म्हणून काम करत एलएलबी व आता एलएलएमपर्यंत मजल मारणाऱ्या जिवीता पाटील यांनी “ध्येय ठरवल्यास कोणतीही परिस्थिती अडथळा ठरत नाही” हा आदर्श समाजापुढे ठेवला आहे. त्यांच्या या प्रेरणादायी यशाबद्दल सर्व स्तरांतून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.