रायगड जिल्हा परिषद निवडणूक पहिल्या टप्प्यात; ग्रामीण राजकारण तापणार…

0
1

रायगड शिवसत्ता टाइम्स (सोहम जाधव):-

राज्यात सध्या महानगरपालिका निवडणुकांचा जोर सुरू असतानाच आता ग्रामीण भागातील राजकारणाला वेग येणार असल्याचे स्पष्ट संकेत मिळत आहेत. रखडलेल्या जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर निवडणूक आयोग सक्रिय झाला असून, रायगड जिल्हा परिषद निवडणूक पहिल्या टप्प्यात होणार असल्याची माहिती समोर येत आहे. त्यामुळे रायगड जिल्ह्यातील राजकीय वातावरण चांगलेच तापण्याची शक्यता आहे.

राज्यात एकूण ३२ जिल्हा परिषदा आणि ३३६ पंचायत समित्यांच्या निवडणुका प्रलंबित आहेत. अनेक ठिकाणी कार्यकाळ संपून दीर्घ काळ लोटला असून, सध्या प्रशासकीय राजवटीतून कारभार सुरू आहे. आरक्षणाच्या पेचामुळे या निवडणुका रखडल्या होत्या. मात्र, आता आरक्षण मर्यादा कायदेशीर चौकटीत असलेल्या जिल्ह्यांमध्ये निवडणूक प्रक्रिया सुरू करण्याची तयारी निवडणूक आयोगाने केली आहे.

सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार २० जिल्हा परिषदांमधील आरक्षण ५० टक्क्यांहून अधिक असल्याने त्या ठिकाणच्या निवडणुका तात्पुरत्या स्थगित ठेवण्यात आल्या आहेत. या प्रकरणाची पुढील सुनावणी २१ जानेवारीला होणार असून, त्यानंतर दुसऱ्या टप्प्यातील निवडणुकांबाबत निर्णय होण्याची शक्यता आहे. मात्र, पहिल्या टप्प्यातील निवडणुकांसाठी आयोगाने तयारी वेगाने सुरू केली आहे.

पहिल्या टप्प्यात पुणे, सातारा, सांगली, सोलापूर, कोल्हापूर, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, छत्रपती संभाजीनगर, परभणी, धाराशिव आणि लातूर या १२ जिल्हा परिषदांचा समावेश आहे. यामध्ये रायगड जिल्ह्याचा समावेश झाल्याने स्थानिक राजकीय पक्ष, इच्छुक उमेदवार आणि कार्यकर्ते तयारीला लागले आहेत.

मतदार याद्या अद्ययावत करणे, प्रशासकीय तयारी आणि आचारसंहिता लागू करण्याबाबतचे प्राथमिक नियोजन अंतिम टप्प्यात असल्याची माहिती सूत्रांकडून मिळत आहे. त्यामुळे येत्या काही दिवसांत अधिकृत निवडणूक कार्यक्रम जाहीर होण्याची शक्यता असून, रायगड जिल्ह्यात पुन्हा एकदा ग्रामीण राजकारणाचे रणसंग्राम रंगणार असल्याचे चित्र आहे.