एसबीसी क्रिकेट अकॅडमीचा आरुष कोल्हे मुंबई अंडर-14 संघाचा कर्णधार; महाडसह रायगडचा अभिमान…

0
4

महाड शिवसत्ता टाइम्स (निलेश लोखंडे):- 

महाड येथील एसबीसी क्रिकेट अकॅडमीचा होतकरू खेळाडू आरुष सचिन कोल्हे याची मुंबई क्रिकेट असोसिएशनच्या 14 वर्षाखालील मुंबई संघाच्या कर्णधारपदी निवड झाली आहे. आरुषच्या या निवडीमुळे महाड शहरासह संपूर्ण रायगड जिल्ह्यात आनंदाचे वातावरण निर्माण झाले असून, ही बाब क्रिकेटप्रेमींसाठी अभिमानास्पद ठरत आहे.

आरुष कोल्हे याने 14 वर्षाखालील मुंबई संघाकडून खेळताना सातत्यपूर्ण आणि दमदार कामगिरी केली आहे. मुंबईतील निवड चाचणी स्पर्धांमध्ये त्याने मोठ्या धावसंख्या उभारल्या असून, अनेकदा शतके झळकावत आपली गुणवत्ता सिद्ध केली आहे. यापूर्वी तो मुंबई अंडर-14 संघाचा उपकर्णधार म्हणून जबाबदारी सांभाळत होता. मात्र, त्याच्या खेळातील सातत्य, संयम आणि नेतृत्वगुण लक्षात घेऊन यावेळी त्याची थेट कर्णधारपदी निवड करण्यात आली आहे.

गेल्या 8 ते 9 वर्षांपासून महाड येथील एसबीसी क्रिकेट अकॅडमीत आरुष क्रिकेटचे धडे गिरवत आहे. कठोर मेहनत, शिस्तबद्ध सराव आणि खेळावर असलेली निष्ठा ही त्याच्या यशाची प्रमुख कारणे मानली जात आहेत. त्याचबरोबर आई-वडिलांकडून मिळणारे सातत्यपूर्ण प्रोत्साहनही त्याच्या प्रगतीत मोलाचे ठरले आहे. आरुषच्या या यशाबद्दल सर्व स्तरातून त्याचे कौतुक होत असून, भविष्यकाळात तो भारतीय क्रिकेटमध्ये आपले आणि महाडचे नाव उज्वल करेल, असा विश्वास क्रिकेट जाणकार व्यक्त करत आहेत.

एसबीसी क्रिकेट अकॅडमीचे कोच आवेश चिचकर यांनी आरुषचे विशेष कौतुक करताना सांगितले की, “आरुष हा अत्यंत मेहनती आणि तितकाच टॅलेंटेड खेळाडू आहे. त्याच्या सातत्यपूर्ण मेहनतीचे फळ आज त्याला मिळत आहे.”

दरम्यान, गुजरात क्रिकेट असोसिएशन आयोजित पश्चिम विभागीय अंडर-14 कसोटी स्पर्धा 18 जानेवारीपासून सुरू होत आहे. या स्पर्धेत गुजरात, बडोदा, सौराष्ट्र, महाराष्ट्र आणि मुंबई हे संघ सहभागी होणार असून, या स्पर्धेत महाडचा आरुष सचिन कोल्हे मुंबई संघाचे नेतृत्व करणार आहे. ही बाब महाड व रायगड जिल्ह्यासाठी निश्चितच अभिमानाची आहे.

आरुषच्या निवडीबद्दल एसबीसी क्रिकेट अकॅडमीचे संस्थापक अध्यक्ष बशिर चिचकर, संजीव शेठ, विजय जाधव, कल्याण जगदाळे, ॲड. दत्ता वाडकर, ॲड. पंकज पंडित, संदीप शेठ, अशोक कोकणे, विनायक जाधव आणि अनिल हेलेकर यांनी त्याचे अभिनंदन करून पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या आहेत.