न्यू इंग्लिश स्कूल वलंगमध्ये राजमाता जिजाऊ व स्वामी विवेकानंद जयंती उत्साहात साजरी; वक्तृत्व स्पर्धेचे आयोजन…

0
3

महाड शिवसत्ता टाइम्स (निलेश लोखंडे):- 

वलंग शिक्षण प्रसारक मंडळाच्या न्यू इंग्लिश स्कूल वलंग येथे दिनांक १२ जानेवारी २०२६ रोजी राजमाता, राष्ट्रमाता जिजाऊ माँसाहेब आणि स्वामी विवेकानंद यांची जयंती अत्यंत उत्साहात व प्रेरणादायी वातावरणात साजरी करण्यात आली. या निमित्ताने विद्यार्थ्यांच्या व्यक्तिमत्त्व विकासासाठी वक्तृत्व स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते.

कार्यक्रमाची सुरुवात राजमाता जिजाऊ आणि स्वामी विवेकानंद यांच्या प्रतिमांना पुष्पहार अर्पण करून करण्यात आली. यावेळी विद्यालयाचे सांस्कृतिक विभाग प्रमुख श्री. गंगाधर साळवी सर व उपप्रमुख सौ. अश्विनी घरटकर मॅडम यांच्या हस्ते प्रतिमांचे पूजन करून अभिवादन करण्यात आले. उपस्थित मान्यवरांनी दोन्ही महान व्यक्तिमत्त्वांच्या विचारांना उजाळा देत विद्यार्थ्यांना त्यांच्या जीवनातून प्रेरणा घेण्याचे आवाहन केले.

वक्तृत्व स्पर्धेमध्ये विद्यार्थ्यांनी राजमाता जिजाऊंचे राष्ट्रउभारणीतले योगदान, छत्रपती शिवाजी महाराजांवरील संस्कार तसेच स्वामी विवेकानंदांचे युवकांसाठीचे विचार, आत्मविश्वास आणि राष्ट्रसेवा याविषयी प्रभावी मांडणी केली. या स्पर्धेसाठी श्री. गणेश कोळी सर आणि श्री. दीपेश जाधव सर यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.

स्पर्धेचा निकाल जाहीर करताना कुमारी रिद्धी सुनील धाडवे हिने प्रथम क्रमांक, कुमार स्वस्तिक राजू मोरे याने द्वितीय क्रमांक तर कुमार रोनक सचिन चिविलकर याने तृतीय क्रमांक पटकावला. यशस्वी विद्यार्थ्यांचे विद्यालयातर्फे अभिनंदन व कौतुक करण्यात आले.

कार्यक्रमाचे संपूर्ण नियोजन व अंमलबजावणी मुख्याध्यापक मा. कुर्डूनकर सर यांच्या मार्गदर्शनाखाली सुरळीतपणे पार पडली. तसेच ज्येष्ठ लिपिक श्री. बर्वे एस. एस., श्री. गायकवाड एस. के., शिक्षकवृंद व सर्व विद्यार्थ्यांनी कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी मोलाचे सहकार्य केले. हा उपक्रम विद्यार्थ्यांमध्ये राष्ट्रभक्ती, आत्मविश्वास व सामाजिक जाणीव निर्माण करणारा ठरला, असे मत उपस्थितांनी व्यक्त केले.