प्रभाग २१ मध्ये सुतार पॅटर्नचा दणदणीत विजय… जयेंद्र सुतार किंगमेकर, जयवंत सुतार पुन्हा Boss सिद्ध…

0
2

नवी मुंबई शिवसत्ता टाइम्स (वार्ताहर):- 

नवी मुंबई महानगरपालिका निवडणुकीत प्रभाग क्रमांक २१ मध्ये जे चित्र समोर आलं आहे, ते कुठल्याही राजकीय विश्लेषणापेक्षा ठोस आणि ठणकावून सांगणारं आहे. इथे फक्त आणि फक्त सुतारच चालतात. सत्ता, पक्ष किंवा घोषणा नव्हे, तर काम, विश्वास आणि समाजसेवेच्या जोरावर सुतार परिवाराने पुन्हा एकदा आपली पकड सिद्ध केली आहे.

या निवडणुकीत माजी नगरसेविका माधुरी सुतार आणि माजी महापौर जयवंत सुतार दोन्ही उमेदवार दणदणीत विजयी ठरले असले, तरी या विजयामागे खरा गेमचेंजर ठरला तो म्हणजे समाजसेवक जयेंद्र सुतार. कुठलाही गाजावाजा न करता, कुठल्याही पदाच्या हव्यासाशिवाय, पडद्यामागून संपूर्ण प्रभागातील राजकीय गणितं हलवणारे जयेंद्र सुतार हेच या निवडणुकीतील खरे किंगमेकर ठरल्याची चर्चा उघडपणे सुरू आहे.

गेल्या अनेक वर्षांपासून सुतार परिवार समाजसेवेची ओळख म्हणून प्रभाग २१ मध्ये ओळखला जातो. निवडणूक आली की दिसणारे चेहरे नव्हेत, तर वर्षानुवर्षे सातत्याने लोकांच्या अडचणींमध्ये उभे राहणारे नेतृत्व म्हणून सुतार कुटुंबाकडे पाहिले जाते. आरोग्य शिबिरे, मोफत तपासण्या, अल्प दरातील शस्त्रक्रिया, शासकीय योजनांचा लाभ मिळवून देणे, महिलांसाठी आत्मनिर्भरतेचे उपक्रम हे सगळे उपक्रम निवडणुकीसाठी नव्हे, तर समाजासाठी राबवले गेले आणि त्याचाच परतावा मतपेटीतून मिळाला.

विशेषतः महिलांसाठी राबवलेले मोफत वाहन प्रशिक्षण शिबीर आणि दर आठवड्याला सुरू असलेली आरोग्य सेवा ही सुतार पॅटर्नची ठळक ओळख बनली आहे. त्यामुळेच शिरवणे गावासह संपूर्ण प्रभागात कामावर विश्वास ठेवणारा मतदारवर्ग ठामपणे सुतारांच्या पाठीशी उभा राहिला.

या सगळ्या घडामोडींमध्ये एक गोष्ट पुन्हा अधोरेखित झाली. जयवंत सुतार पुन्हा एकदा Boss ठरले. अनुभव, जनसंपर्क आणि मजबूत संघटनाच्या जोरावर त्यांनी आपली राजकीय उंची कायम राखली आहे. तर जयेंद्र सुतार यांनी पडद्यामागून सूत्रे हलवत सुतार परिवाराची ताकद दाखवून दिली.

आज प्रभाग २१ मध्ये निकालानंतर वातावरण एकच संदेश देत आहे .सुतार परिवार म्हणजे समाजसेवा, सुतार पॅटर्न म्हणजे विश्वास, आणि नवी मुंबईत प्रभाग २१ मध्ये सत्ता म्हणजे सुतारच.