महाड तालुक्यातील तुढील पंचायत समिती गटात सौ. प्राजक्ता जयवंत दळवी यांना उमेदवारी; भाजप स्वबळावर मैदानात, किंगमेकर ठरण्याची शक्यता…

0
3

 

महाड शिवसत्ता टाइम्स (निलेश लोखंडे):-

महाड तालुक्यातील तुढील पंचायत समिती गटात आगामी जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भारतीय जनता पार्टीने स्वबळावर निवडणूक लढवण्याचा ठाम निर्णय घेतला आहे. कोणत्याही पक्षाशी युती न करता थेट जनतेच्या विश्वासावर निवडणूक लढवण्याची भूमिका भाजपने घेतल्याने स्थानिक राजकारणात मोठी खळबळ उडाली आहे.

तुढील पंचायत समिती गटातून सौ. प्राजक्ता जयवंत दळवी यांना भाजपकडून अधिकृत उमेदवारी देण्यात आली असून त्या या निवडणुकीत भाजपसाठी महत्त्वाची भूमिका बजावतील, असा विश्वास पक्षनेतृत्वाने व्यक्त केला आहे. भाजप स्वबळावर लढत असली तरी निवडणूक निकालानंतर जिल्हा परिषदेत किंगमेकरची भूमिका बजावण्याची संधी भाजपकडे असेल, असे राजकीय जाणकारांचे मत आहे.

सौ. प्राजक्ता जयवंत दळवी या चिंबावे ग्रामपंचायतीच्या माजी सरपंच असून त्यांच्या कार्यकाळात ग्रामपंचायतीत विकासकामांना गती मिळाली. रस्ते, पाणीपुरवठा, स्वच्छता, महिला बचत गटांना प्रोत्साहन, तसेच विविध सरकारी योजनांचा थेट लाभ नागरिकांपर्यंत पोहोचवण्यासाठी त्यांनी विशेष प्रयत्न केले. त्यांच्या कार्यशैलीमुळे त्या एक कार्यक्षम, अभ्यासू आणि जनतेशी थेट संवाद साधणाऱ्या नेत्या म्हणून ओळखल्या जातात.

तरुण, तडफदार आणि नव्या विचारांचे नेतृत्व म्हणून सौ. प्राजक्ता दळवी यांची ओळख आहे. ग्रामीण भागातील प्रश्न, शेतकऱ्यांच्या अडचणी, महिला व युवकांच्या समस्या यांचा त्यांना प्रत्यक्ष अनुभव असून त्या प्रश्नांना प्रभावीपणे मांडण्याची क्षमता त्यांच्याकडे आहे. त्यामुळे तुढील पंचायत समिती गटात त्यांना मोठा जनसमर्थन मिळत असल्याचे चित्र दिसून येत आहे.

भाजपने स्वबळावर निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतल्यामुळे इतर पक्षांमध्ये अस्वस्थता निर्माण झाली आहे. पारंपरिक राजकीय समीकरणांना छेद देत भाजप थेट जनतेकडे जात असून विकास, पारदर्शकता आणि सक्षम नेतृत्व हे मुद्दे केंद्रस्थानी ठेवले जात आहेत. या निवडणुकीत सौ. प्राजक्ता जयवंत दळवी विजयी होतील आणि तुढील पंचायत समिती गटात भाजपचा झेंडा फडकवतील, असा विश्वास भाजप कार्यकर्त्यांमध्ये व्यक्त केला जात आहे.