रा. जि. प. शाळा खांदाडचे वार्षिक स्नेहसंमेलन उत्साहात संपन्न…

0
2

माणगाव शिवसत्ता टाइम्स (नरेश पाटील):-

शनिवार, दि. १८/०१/२०२६ रोजी रा. जि. प. शाळा खांदाड येथील वार्षिक स्नेहसंमेलन अत्यंत उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाले. विद्यार्थ्यांच्या सुप्त कलागुणांना वाव देणे, त्यांचा आत्मविश्वास वाढवणे व सर्वांगीण विकास घडवणे या उद्देशाने आयोजित करण्यात आलेला हा उपक्रम शाळेच्या शैक्षणिक व सांस्कृतिक वाटचालीचा महत्त्वाचा भाग ठरला.

कार्यक्रमाच्या प्रारंभी मान्यवर पाहुण्यांचे व्यासपीठावर आगमन झाले. त्यानंतर दीपप्रज्वलन करून कार्यक्रमाची औपचारिक सुरुवात करण्यात आली. शाळा व्यवस्थापन समिती व शाळेच्या शिक्षकवर्गाच्या वतीने उपस्थित मान्यवरांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले. यानंतर सामाजिक कार्यकर्ते संतोष उर्फ बाळा मांजरे यांच्या हस्ते श्रीफळ अर्पण करून सांस्कृतिक कार्यक्रमांना प्रारंभ होण्यास चालना दिले.

यानंतर विद्यार्थ्यांनी सादर केलेल्या ईशस्तवन व सुमधुर स्वागतगीताने संपूर्ण वातावरण भक्तिमय व प्रसन्न झाले. लहानग्यांच्या चेहऱ्यावर झळकणारा आनंद व आत्मविश्वास उपस्थित प्रत्येकाच्या मनाला स्पर्श करून गेला.

या स्नेहसंमेलनात विद्यार्थ्यांनी गणेशवंदना, कोळीगीत, आदिवासी गीत, गोंधळगीत, बालगीत, रिमिक्स लावणी, पर्यावरण थीम लावणी, विज्ञान लावणी, स्वच्छतेचा संदेश देणारे नाटक, मोबाईलवर आधारित बालनाट्य (एकांकिका), तसेच साईबाबा इंडियन गीत अशा विविध कलाप्रकारांतून आपली कला सादर केली. नृत्य, नाट्य व गीतांच्या माध्यमातून सामाजिक जाणीव, पर्यावरण संवर्धन व मूल्यशिक्षणाचा प्रभावी संदेश देण्यात आला.
प्रत्येक सादरीकरणाला उपस्थित प्रेक्षकांनी टाळ्यांच्या कडकडाटात भरभरून दाद दिली, ज्यामुळे विद्यार्थ्यांचा उत्साह अधिकच वाढला. विद्यार्थ्यांच्या आत्मविश्वासपूर्ण व शिस्तबद्ध सादरीकरणामुळे संपूर्ण सभागृह आनंदाने भारून गेले होते.

या कार्यक्रमाला मा. ज्ञानदेव पोवार साहेब, सामाजिक कार्यकर्ते संतोष बाळा मांजरे, नथुराम पोवार, महेश (बाळा डीजे) पोवार, संजय मालोर, कैलास पोवार, मोरे सर,केंद्र प्रमुख शिंदे सर, अंगणवाडी सेविका सौ. सुवर्णा मांजरे, स्नेहल भानकर, आशा सेविका सौ. पूर्वा मांजरे, तसेच सरिता दळवी उपस्थित होत्या.

कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनात शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष महेश महादेव पोवार, उपाध्यक्ष सौ. तेजू घर्वे, सदस्य सौ. सुनंदा काटकर, सचिन मांजरे, महेश पोवार, सौ. संजिवनी माने, सौ. निलिमा मालोरे, शाळेच्या मुख्याध्यापिका सौ. वाले, सहकारी शिक्षिका वेदपाठक मॅडम यांचे मोलाचे योगदान लाभले. यावेळी बहुसंख्य पालकवर्ग मोठ्या संख्येने उपस्थित राहून कार्यक्रमाची शोभा वाढवली.