महाड शिवसत्ता टाइम्स (निलेश लोखंडे):-
सायक्लिंग यूथ महाड व यूथ क्लब महाड यांच्या संयुक्त विद्यमाने आणि महाड पोलादपूर सायकल रेस कमिटी यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजित ‘रायगड सायक्लोथॉन २०२६’ हा भव्य सायकलिंग उपक्रम रविवार १ फेब्रुवारी २०२६ रोजी मोठ्या उत्साहात पार पडला. हॉटेल आंग्रे किचन,महाड येथून या स्पर्धेचा प्रारंभ झाला. या सायक्लोथॉनमध्ये फिटनेस, पर्यावरण संरक्षण, युवाशक्ती सक्षमीकरण, पर्यटन संवर्धन, जनजागृती व सायकलिंग महत्त्व वाढविणे या उद्देशाने आयोजन करण्यात आले होते. कार्यक्रमाची संकल्पना – “Ride for Fitness, Ride for Pride” ही विशेष आकर्षण ठरली. या उपक्रमात एकूण ८६ सायकलपटूंनी महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यांतून सहभाग नोंदवला. स्पर्धेत दोन प्रमुख प्रकार होते. फन राइड-१५ किमी आणि राजधानी राइड- ५० किमी. कार्यक्रमाचे उद्घाटन मा.श्री.खुशाल खेडेकर(पोलीस उपनिरीक्षक,महाड तालुका पोलीस स्टेशन) यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी प्रमुख उपस्थित मान्यवर म्हणून डुफ्लॉन कंपनीचे प्रेसीडंट श्री आनंद सरवणकर,डॉ चंद्रशेखर दाभाडकर,बिरला कंपनीचे व्हि पी श्री आनंद सिंह,यूथ क्लबचे अध्यक्ष श्री राजेश बुटाला,महाड पोलादपूर सायकल कमिटीचे अध्यक्ष श्री.संतोष मोरे आदी उपस्थित होते. स्पर्धेतील विजेते: राजधानी राईड-ओपन गट प्रथम क्रमांक सिद्धेश अजित पाटील रु.११०००/,द्वितीय क्रमांक आर्यन संजय मारळ रु ७५००,तृतीय क्रमांक ओंकार कृष्ण खेडेकर- रु.५०००,राजधानी राईड-महाड पोलादपूर मर्यादित गट प्रथम क्रमांक मयूर मनोज धाडवे रु ३०००,द्वितीय क्रमांक विनय विनोद धाडवे-रु.२०००,तृतीय क्रमांक अतुल नरेंद्र गायकवाड रु.१०००,किंग ऑफ माऊंटन-रायगड घाट सिद्धेश अजित पाटील ही रायगड सायक्लोथॉनची पहिलीच आवृत्ती असून, यामध्ये महिला सहभाग, युवा सहभाग आणि सर्व वयोगटांचा सहभाग हे विशेष वैशिष्ट्य ठरले. प्रत्येक सहभागी सायकलपटूस फिनिशर मेडल प्रदान करण्यात आले. सहभागींचा उत्साह, सकारात्मक प्रतिसाद आणि शिस्तबद्ध सहभाग आयोजकांचे मनोबल वाढवणारा ठरला. कार्यक्रम यशस्वीपणे पार पाडण्यासाठी यूथ क्लब महाड तसेच चॅम्पियन स्पोर्ट्स अकैडमी, महाड आणि महाड पोलादपूर सायकल रेस कमिटी यांच्या वॉलंटियर्सचा मोलाचा सहभाग लाभला. त्यांच्या नियोजनबद्ध कामगिरीमुळे, शिस्तबद्ध व्यवस्थापनामुळे आणि सेवाभावी वृत्तीमुळे संपूर्ण कार्यक्रम अतिशय सुरळीत व उत्कृष्टरीत्या पार पडला. महाडचे उपनगराध्यक्ष श्री. संदीप जाधव यांनी स्वतः फन राइडमध्ये सहभाग नोंदवून नागरिकांना सायकल चालवण्याचा, आरोग्य जपण्याचा आणि पर्यावरणपूरक जीवनशैली स्वीकारण्याचा प्रेरणादायी संदेश दिला. याशिवाय, फन राइडमधील स्पर्धकांसाठी लकी ड्रॉच्या माध्यमातून सायकल हेल्मेटचे बक्षीस वितरण करण्यात आले,ज्यामुळे सायकलिंगमधील सुरक्षिततेचा संदेश प्रभावीपणे देण्यात आला. विशेष प्रेरणादायी बाब म्हणजे पाटण येथून ६८ वर्षीय श्री.बजरंग पिंपळे आणि पुणे येथून ७६ वर्षीय डॉक्टर सुभाष कोकणे हे स्वतः सायकल चालवत महाड येथे रायगड सायक्लोथॉनसाठी पोहोचले होते, ज्यामुळे उपस्थितांमध्ये प्रेरणा आणि उत्साहाचे वातावरण निर्माण झाले. रायगड सायक्लोथॉन २०२६ हा उपक्रम केवळ स्पर्धा न राहता, तो आरोग्य, पर्यावरण, समाजप्रबोधन आणि युवा चळवळीचा प्रेरणादायी संदेश देणारा महोत्सव ठरला.

