करंजखोल येथे भाजपा राष्ट्रवादी युतीची भव्य जाहीर सभा… 

0
3

महाड शिवसत्ता टाइम्स (निलेश लोखंडे):- 

महाड तालुक्यातील करंजखोल येथे नडगाव तर्फे बिरवाडी जिल्हा परिषद गट व पंचायत समिती गणासाठी राष्ट्रवादी काँग्रेस व भारतीय जनता पार्टी महायुतीच्या वतीने आयोजित जाहीर सभा मोठ्या उत्साहात पार पडली. या सभेत जिल्हा परिषदेचे उमेदवार निलेश महाडीक तसेच पंचायत समिती गणाचे उमेदवार सौ. चैत्राली विनोद दिघे व अ‍ॅड. सुरेश जामदार यांच्या प्रचारासाठी महायुतीच्या प्रमुख नेत्यांनी सविस्तर मार्गदर्शन केले.

यावेळी मार्गदर्शन करताना ना. अदितीताई तटकरे यांनी सभेच्या सुरुवातीलाच भावनिक मनोगत व्यक्त केले. २८ तारखेला राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे कुटुंबप्रमुख स्व. अजितदादा पवार यांचे निधन झाल्याने काही दिवस प्रचारात सहभागी होता आले नाही, याबाबत त्यांनी उमेदवारांची जाहीर माफी मागितली. नेतृत्व गमावल्याचे दुःख असले तरी जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणुकीत महायुती एकसंध असून उमेदवारांच्या पाठीशी खंबीर उभी आहे, असे त्या म्हणाल्या. स्व. अजितदादांच्या निधनानंतरही प्रचार यंत्रणा अखंड सुरू ठेवणार्‍या कार्यकर्त्यांचे त्यांनी विशेष आभार मानले. हा काळ टीका-टिप्पणीचा नसून संयम, एकजूट आणि शिस्तीने काम करण्याचा आहे. जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणुका सात आठ वर्षांनंतर होत असून हा भागासाठी अतिशय महत्त्वाचा टप्पा आहे, असे त्या म्हणाल्या.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही स्व. अजितदादांच्या स्मरणार्थ प्रचारसभा रद्द केल्याचा उल्लेख करत, राजकारणाच्या पलीकडील संबंध आणि संवेदनशीलतेचे उदाहरण त्यांनी अधोरेखित केले. विजय मिळवूनच स्व. अजितदादांना खरी श्रद्धांजली अर्पण करता येईल, असे आवाहन त्यांनी कार्यकर्त्यांना केले. सभेत ना. प्रवीणभाऊ दरेकर यांनी मुद्देसुद भाषण करत जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीचे महत्त्व विशद केले. गावपातळीवरील प्रश्न, अडचणी व जनतेचे सुख-दुःख समजून घेणारे नेतृत्व निवडण्याची ही निवडणूक आहे, असे त्यांनी सांगितले. दडपशाही, गुंडगिरी व दहशतीला उत्तर देण्यासाठी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेले मतदानाचे शस्त्र वापरण्याचे आवाहन त्यांनी केले.

छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांवर चालणारे, अठरापगड जातींना सोबत घेणारे संस्कारक्षम नेतृत्व या मतदारसंघाला हवे असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. विरोधकांकडून जनतेची फसवणूक होत असल्याचा आरोप करत, लोकशाही मार्गाने त्यांना धडा शिकवण्याचे आवाहन त्यांनी केले.ना. दरेकर यांनी करंजखोल व परिसरात राबविण्यात आलेल्या विकासकामांचा सविस्तर आढावा घेतला. सोमजाई मंदिर भक्तनिवास, अंतर्गत रस्ते, पाणीपुरवठा योजना, पर्यटन विकास, शाळा दुरुस्ती, स्मशानभूमी, सभामंडळे, तसेच १७५ कोटी रुपयांचे २०० खाटांचे सुपर स्पेशालिस्ट हॉस्पिटल या महत्त्वाकांक्षी प्रकल्पाची माहिती त्यांनी दिली. हा खरा विकास असून महाड—पोलादपूर तालुक्याच्या आरोग्य, शिक्षण व पायाभूत सुविधांमध्ये आमूलाग्र बदल घडवणारा आहे, असे ते म्हणाले.

जनतेच्या पैशावर डल्ला मारणारे नव्हे, तर जनतेच्या पैशाचे रक्षण करणारे प्रतिनिधी जिल्हा परिषदेत पाठवायचे आहेत, असे सांगत दरेकर यांनी निलेश महाडीक, सौ. चैत्राली दिघे व अ‍ॅड. सुरेश जामदार यांना मोठ्या मताधिक्याने विजयी करण्याचे आवाहन केले.सभेपूर्वी छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून स्व. अजितदादा पवार यांना दोन मिनिटे मौन पाळून श्रद्धांजली अर्पण करण्यात आली.यावेळी व्यासपीठावर ना. प्रविण दरेकर, ना.अदिती तटकरे, माजी नगराध्यक्ष स्नेहल जगताप, भाजपा परिषद सदस्य बिपीन महामुणकर, जि.प. उमेदवार निलेश महाडीक, पं.स. उमेदवार अ‍ॅड. सुरज जामदार, पं.स. उमेदवार चैत्राली विनोद दिघे, भाजपा जिल्हा सरचिटणीस हेमा मानकर, भाजपाचे नागेद्र राठोड, कृष्णा शिंदे, नगरसेवक सुमित पवार, नगरसेवक सुरज बामने, नगरसेवक अक्षया हेलेकर, राष्ट्रवादी विधानसभा अध्यक्ष राजेंद्र कोरपे, संदिप ठोंबरे, भाजपा महिला मोर्चा जिल्हा अध्यक्ष डॉ. मंजुषा कुद्रीमोती, निलीमा भोसले, महेश शिंदे, सरपंच सुनिता महाडीक, सरपंच चंद्रकांत मोरे, प्रवीण महाडीक, विनोद डिघे, चंद्रजित पालांडे यांच्यासह राष्ट्रवादी काँग्रेस आणि भाजपाचे असंख्य पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक महेश शिंदे यांनी केले.