वरंध पंचायत समिती गणात शिवसेनेची लढत भक्कम; सौ. नूतनताई गोपाल मोरे यांना जनतेचा प्रचंड प्रतिसाद…

0
1

महाड शिवसत्ता टाइम्स (निलेश लोखंडे):-

वरंध पंचायत समिती गणातून शिवसेना पक्षाकडून सौ. नूतनताई गोपाल मोरे या निवडणूक रिंगणात उतरल्या असून, संपूर्ण परिसरात त्यांच्या नावाची जोरदार चर्चा सुरू आहे. नामदार भरत शेठ गोगावले यांचा आशीर्वाद आणि त्यांचे पती गोपाल मोरे यांची भक्कम साथ यामुळे नूतनताई या निवडणुकीत निश्चितच भरघोस मतांनी विजयी होतील, असा विश्वास कार्यकर्ते आणि नागरिकांमधून व्यक्त होत आहे.

सौ. नूतनताई मोरे या निगडी ग्रामपंचायतीच्या विद्यमान सरपंच असून, त्यांच्या कार्यकाळात त्यांनी विकासाचा ठसा उमटवला आहे. विशेषतः महिलांच्या सर्वांगीण विकासासाठी त्यांनी बचत गटांच्या माध्यमातून ऐतिहासिक आणि परिणामकारक कामे केली. अनेक महिलांना आर्थिकदृष्ट्या सक्षम करून स्वतःच्या पायावर उभे राहण्याची संधी त्यांनी निर्माण केली, त्यामुळे महिला वर्गात त्यांच्याबद्दल मोठा विश्वास आहे. सरपंच पदाच्या कालावधीत त्यांनी गावातील मूलभूत सुविधांना प्राधान्य दिले. नामदार भरत गोगावले यांच्या माध्यमातून विविध आरोग्य सेवा गावात राबवण्यात आल्या. आरोग्य शिबिरे, उपचार सुविधा, गरजू रुग्णांना मदत अशा उपक्रमांमुळे सर्वसामान्य जनतेला मोठा दिलासा मिळाला.

शिक्षण क्षेत्रातही नूतनताईंनी महत्त्वाचे योगदान दिले आहे. शालेय विद्यार्थ्यांसाठी दरवर्षी पुस्तके वाटप, दत्तक योजना यामध्ये सक्रिय सहभाग घेऊन विद्यार्थ्यांच्या शिक्षणाला हातभार लावला. पाणीपुरवठ्याच्या दृष्टीने जलजीवन योजना प्रभावीपणे राबवून गावात स्वच्छ आणि नियमित पाणीपुरवठा उपलब्ध करून देण्यात त्यांनी मोलाची भूमिका बजावली. या सर्व विकासकामांचा विचार करता, वरंध पंचायत समिती गणातून शिवसेनेच्या माध्यमातून सौ. नूतनताई गोपाल मोरे यांचा विजय निश्चित मानला जात असून, जनतेचा वाढता प्रतिसाद हेच त्याचे स्पष्ट संकेत देत आहे.