माणगांव शिवसत्ता टाइम्स (नरेश पाटील):-
श्रद्धा, परंपरा आणि भक्तिभाव यांच्या त्रिवेणी संगमातून पोवार घराण्याच्या कुलदैवत श्री कुलस्वामिनी देवीच्या मूर्तीची स्थापना व प्राणप्रतिष्ठा मंगळवार, दि. १० फेब्रुवारी २०२६ रोजी खांदाड ता. माणगांव, माणगांव शहर येथे पार पडणार आहे. पिढ्यान्-पिढ्या चालत आलेल्या कुलदैवताच्या उपासनेला या पवित्र सोहळ्याने नवसंजीवनी मिळणार असून संपूर्ण परिसर आध्यात्मिक ऊर्जेने भारावून जाणार आहे.
वैदिक मंत्रोच्चार, शास्त्रोक्त विधी आणि भक्तिभावाने ओतप्रोत असा हा सोहळा ग्रामजीवनाला धार्मिक व सांस्कृतिक बळ देणारा ठरणार आहे. सकाळी १०.३० वाजता श्री सोमनाथ मंदिरापासून श्री कुलस्वामिनी मंदिरापर्यंत निघणारी पालखी मिरवणूक ही श्रद्धेची साक्ष देणारी ठरेल. त्यानंतर दुपारी १२.४५ वाजता मूर्ती प्राणप्रतिष्ठा व होमहवन, तसेच ३.४५ वाजता श्री सत्यनारायण महापूजा होणार आहे.
सायंकाळी ७.१५ वाजता संगीत भजन कार्यक्रमातून भक्तीभाव अधिक दृढ होईल, तर रात्री ८.१५ वाजता महाप्रसादाने या पावन उत्सवाची सांगता होईल. या सर्व विधींमधून ग्रामसमृद्धी, कुटुंबकल्याण व सामाजिक ऐक्य यासाठी देवीचरणी प्रार्थना अर्पण केली जाणार आहे.
या धार्मिक उपक्रमाचे आयोजन ग्रामस्थ मंडळ, महिला मंडळ व नवयुवक मित्र मंडळ, खांदाड यांच्या संयुक्त विद्यमाने करण्यात आले आहे. ज्ञानदेव मारुती पोवार (मा. नगराध्यक्ष, माणगांव नगरपरिषद), काशीराम बाजी पोवार (अध्यक्ष, ग्रामस्थ मंडळ, खांदाड) तसेच सखाराम भिकू पोवार (पुजारी) यांच्या मार्गदर्शनाखाली हा सोहळा संपन्न होणार आहे.
श्री कुलस्वामिनी देवीच्या कृपाशीर्वादाने गावात सुख-शांती, समृद्धी व सद्भाव नांदावा, या भावनेतून आयोजित करण्यात आलेल्या या पवित्र कार्यक्रमास भाविकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून दर्शन-प्रसादाचा लाभ घ्यावा, असे आवाहन आयोजकांनी केले आहे.

