मुंबई शिवसत्ता टाइम्स (वार्ताहर):-
राज्यात आगामी विधानसभा निवडणुकीच्या उद्देशाने आता सगळेच पक्ष मैदानात उतरले आहेत. मोठमोठ्या राजकीय नेत्यांपासून छोट्या कार्यकर्त्यांपर्यंत सर्वच मेहनत घेताना दिसत असून राज्यात होणाऱ्या बैठका आणि सभांमधून त्याचा प्रत्यय येत आहे. असे असतानाच मात्र निवडणुका नक्की कधी होणार याची कोणालाच कल्पना नाही. निवडणूक आयोगाकडून अद्याप विधानसभा निवडणुका कधी होणार? मतदानाची तारीख आणि मतमोजणीची तारीख काय असणार? याबाबत कोणतीही स्पष्टोक्ती करण्यात आलेली नाही. मात्र, आता सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, विधानसभा निवडणुकांबाबत मोठी बातमी समोर येत असून नोव्हेंबर महिन्यातील दुसऱ्या आठवड्यात निवडणुका पार पडण्याची शक्यता आहे. दिवाळी संपल्यानंतर नोव्हेंबरच्या पहिल्या आठवड्यात मतदान पार पडणार असून त्यानांतर १४ किंवा १५ नोव्हेंबर दरम्यान निवडणुकीचा निकाल लागण्याची शक्यता आहे.नियमानुसार,राज्यात २६ नोव्हेंबर २०२४ रोजी नवी विधानसभा अस्तित्वात येणार आहे. आचारसंहिता लागू झाल्यानंतर साधारणतः ४५ दिवसांनी नवीन विधानसभेची स्थापना होणे अपेक्षित आहे. त्यामुळे निवडणूक आयोगाने नोव्हेंबर महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यात निवडणूक घ्यायचे ठरवले तर त्यासाठी साधारणपणे १२ ऑक्टोबरपर्यंत निवडणुकांचे वेळापत्रक जाहीर केले जाईल…गेल्या काही दिवसांपासून राज्यात २० सप्टेंबरपर्यंत आचारसंहिता लागेल, अश्या चर्चा रंगलेल्या होत्या…मात्र तसे झाले असते तर निवडणुका दिवाळीपूर्वीच म्हणजे ऑक्टोबरच्या शेवटच्या आठवड्यात झाल्या असत्या. मात्र तशी हालचाल अद्यापतरी राज्य निवडणूक आयोगाकडून दिसत नाही आहे…मात्र सरकारी कामांचा वेग साधारण गतीने सुरू असल्यामुळे ऑक्टोबरच्या शेवटच्या आठवड्यात निवडणूक होण्याची शक्यता कमी आहे.