रोहा शिवसत्ता टाइम्स (अक्षय जाधव):-
गणपती बाप्पा मोरया मंगलमूर्ती मोरया …या जयघोषात रायगडसह कोकणात गणेशोत्सवाची धामधूम सुरू आहे… गणेशोत्सव म्हटलं की आपल्या डोळ्यासमोर येतात ते म्हणजे सुंदर असे देखावे ….असा एक सुंदर देखावा रोहा तालुक्यातील वरसे येथे पालवणकर कुटुंबीयांनी टाकाऊ वस्तूंमधून लालबागच्या राजाचा साकारला आहे…रायगड जिल्ह्यातील रोहा तालुक्यातील वरसे गावात पालवणकर कुटुंबीयांनी गणेशोत्सवाच्या निमित्ताने लालबागच्या राजाचा सुंदर देखावा साकारला आहे. विशेष म्हणजे, हा देखावा टाकाऊ वस्तूंचा वापर करून बनविण्यात आला आहे. या देखाव्याच्या निर्मितीसाठी दहा दिवस अगोदरपासून मेहनत घेण्यात आली होती. पालवणकर कुटुंबीयांची ही सर्जनशीलता गावात चर्चेचा विषय ठरली असून, अनेक भक्तगण आणि नागरिक या देखाव्याला पाहण्यासाठी गर्दी करत आहेत…
यंदाच्या देखाव्याचा विशेष भाग म्हणजे, अष्टविनायकाच्या आठ गणपतींच्या चित्रांचे रेखाटन. या कलाकृतींमुळे देखावा अधिक आकर्षक झाला आहे. पालवणकर कुटुंबीय हे दरवर्षी गणेशोत्सवात नवीन आणि अनोखे देखावे सादर करण्यासाठी प्रसिद्ध आहेत. त्यांच्या कलेचे कौतुक करताना, गावातील नागरिकांनी या देखाव्याचे अभिनंदन केले आहे…या कुटुंबीयांनी पर्यावरणपूरकता जपून, टाकाऊ वस्तूंमधून अशी कलाकृती साकारली असून, हा देखावा बघण्यासाठी अनेकांनी गर्दी केली आहे…