नेरळ शिवसत्ता टाइम्स (संदेश साळुंके) :-
ऐन गणेशोत्सवाच्या काळामध्ये कर्जतमध्ये एकाच कुटुंबातील ३ जणांची हत्या झाल्यामुळे एकच खळबळ उडाली आहे… यामध्ये 9 वर्षांच्या चिमुकल्या मुलाचाही समावेश आहे…या तिघांचे मृतदेह नाल्यात फेकले होते. अखेरीस पोलिसांनी तिहेरी हत्याकांडाचा उलगडा करण्यात यश आले आहे… घर नावावर केले नाही म्हणून सख्खा भावानेच भाऊ, वहिनी आणि पुतण्याचा खून केल्याचे उघड झाले आहे.पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, बोरगाव येथील जैतू पाटील यांनी १५ वर्षांपूर्वी पोशिर इथे घर बांधले आणि ते कुटुंबासह इथे राहू लागले होते…जैतू पाटील यांना मदन आणि हनुमंत अशी दोन मुले होती. दोन्ही मुलांची लग्न लावून दिल्यानंतर ते पत्नीसह बोरगाव या आपल्या मूळगावी रहायला गेले…दोन भाऊ मदन आणि हनुमंत हे त्यांच्या कुटुंबासह पोशिर इथे राहत होते. हनुमंत हा गवंडी काम करायचा तर मदन पाटील याची पत्नी अनिशा या इथे आरोग्य विभागात आशा सेविका म्हणून काम करत होत्या. वडिलांनी बांधलेले घर मदन याच्या नावावर होते.. ही बाब हनुमंत याला खटकत होती. वडिलांनी बांधलेल्या घराचा अर्धा भाग आपल्या नावावर करून द्यावा यासाठी हनुमंत आग्रही होता. यावरून तो अनेकदा मदन सोबत वाद घालत होता…रविवारी सकाळी १० वाजता नेरळ कळंब रस्त्यावरील एका नाल्यात मदन पाटील याचा दहा वर्षांचा मुलगा विवेक याचा मृतदेह आढळून आला. यानंतर स्थानिकांनी त्याच्या आई-वडिलांचा शोध घेण्यास सुरुवात केली असता, नाल्यात आई, अनिशा पाटील यांचा मृतदेह आढळून आला. समोरील दृश्य पाहून हादरलेल्या ग्रामस्थांनी पाटील बंधूंच्या घराकडे धाव घेतली. जेव्हा ग्रामस्थ मदन पाटील यांच्या घरी गेले तेव्हा तिथे मदन यांचाही मृतदेह आढळून आला. मदन पाटील हे रक्ताच्या थारोळ्यात पडले होते…पोलिसांनी या प्रकरणाचा तपास सुरू केला. घरातील सदस्यानेच तिघांची हत्या केली असेल असा संशय पोलिसांना आधीपासून होता. पोलिसांनी हनुमंत याला ताब्यात घेतले आणि चौकशी सुरू केली. पोलिसांनी पोलिसी खाक्या दाखवताच हनुमंत याने खुनाची कबुली दिली. पोलिसांनी हनुमंतला अटक केली आहे. शवविच्छेदन अहवाल आणि पोलिसांच्या तपासात धारदार शस्त्राने वार केल्याचे निष्पन्न झाले आहे….मात्र त्याने ज्या शस्त्राने हत्या केली आहे ते हत्यार अद्यापही हस्तगत केले नाही ….या प्रकरणाचा अधिक तपास गुन्हे अन्वेषण शाखा व सहाय्यक पोलीस निरीक्षक शिवाजी ढवळे आणि त्यांची टीम करीत आहे…