चौक शिवसत्ता टाइम्स (अर्जुन कदम):-
गणरायांच्या आगमनानंतर गौराई माहेरी आल्या…आणि तिच्या पूजनाच्या दिवशी जांब्रूक गावची ग्रामदैवत आई जानाई व आई इंजाई तिच्या भेटीला आल्याने गावात नवचैतन्य प्राप्त झाले आहे…सातारा जिल्ह्यातील कोयना धरणा मुळे जावळी तालुक्यातील जांब्रूक हे गाव रायगड जिल्ह्यातील खालापूर तालुक्यात वावंढळ या गावी स्थायिक झाले, आज ६५ वर्षांपेक्षा जास्त कालावधी झाला. कै. जे.आर. कदम तथा जयसिंगराव राजबाराव कदम यांनी ही सुंदर आणि नियोजन पूर्वक वसाहत स्थापन केली आहे.ग्रामस्थांची देवीवर नितांत श्रद्धा आहे, गावात कधीच वाद विवाद झाले नाहीत,आजही किरकोळ वाद विवाद झाल्यास गावातच मंदीरात मिटवले जातात.६५ वर्षात कधीच पोलीस ठाण्यात कुणीही गेल्याची माहिती उपलब्ध नाही.गावाला एकुण चार मानकरी आहेत, जुन्या गावापासून गौरी पूजनाच्या दिवशी आई जानाई मानकरी राजेंद्र कदम यांच्या कडे तर आई इंजाई मानकरी मयूर मधुकर कदम यांच्या घरी गौरी भेटीला जातात. दोघींची रूपे ग्रामस्थ यांच्या सहकार्याने मानकरी यांच्या घरी जातात. हीच परंपरा जुन्या गावापासून आजही ६५ वर्षानंतर सुरू आहे. आई इंजाई ही घरची कुलस्वामिनी हिच्या सोबत देव्हाऱ्यात विराजमान होतात,तर आई जानाई ही गौरी हिच्या सोबत विराजमान होतात. या दोन्ही ठिकाणी त्यांची विधिवत पूजा झाल्यावर ओवसा पूजन झाल्यावर गावात असलेल्या घरोघरी गौराईचे ओवसा पूजन होते. गौरी पूजनाच्या दिवशी दोघीही मुक्कामी राहतात,यावेळी ग्रामस्थ रात्री जागरण करून भजन करतात,तर महिला गौरीची गाणी, झिम्मा फुगडी खेळ खेळतात. दुसऱ्या दिवशी गणरायांच्या निरोपा अगोदर आई जानाई व आई इंजाई या मंदिरात येतात, शेकडो वर्षांपासून सूरु असलेली देवीच्या आगमनाची परंपरा आजही नवी पिढी चालवत आहे. पुढच्या वर्षी दोघीही माता येण्याची ग्रामस्थ मोठ्या आतुरतेने वाट पहात असतात…