उरण शिवसत्ता टाइम्स (प्रविण पाटील):-
उरण तालुक्यातील भेंडखळ गावातील खाडीच्या नाल्यावरील साकवाच्या पायाची हळूहळू पडझड सुरू झाली आहे… भेंडखळ गावातील खाडी नाल्यावरील साकव मृत अवस्थेत असुन अखेरची घटका मोजत आहेत…यामुळे रात्री अपरात्री हा साकव केव्हाही पडून रहदारी करणाऱ्या रहिवाशांच्या जीवाला धोका निर्माण होण्याची भिती भेडखळ गावातील रहिवासी व्यक्त करत आहेत…
भेंडखळ ग्रामपंचायत हद्दीत सध्या ग्रामपंचायत फंडातून सिडको तसेच इतर शासकीय योजनेच्या माध्यमातून विविध विकास कामे मार्गी लावली जात आहेत. परंतु, रहिवाशांच्या रहदारीसाठी महत्वाचा असलेल्या गावातील खाडीच्या नाल्यावरील साकवाच्या देखभाल दुरुस्तीकडे लक्ष केंद्रित करण्यास कोणालाही वेळ मिळत नाही. यामुळे साकवाचा पाया हळूहळू कमकुवत होत चालला आहे. ही अशीच परिस्थिती राहिली तर रात्री अपरात्री हा साकव पडून रहदारी करणाऱ्या रहिवाशांच्या जीवितास धोका निर्माण होऊ शकतो. याआधी फुंडे व धुतूम ग्रामपंचायत हद्दीतील साकव पडून एका कामगाराचा तसेच मासेमारीसाठी गेलेल्या आदिवाशी बांधवांचा मुत्यू झाल्याची घटना घडली आहे. तरी ती पुनरावृत्ती पुन्हा घडू नये यासाठी या साकवाचे दुरुस्तीचे किंवा नव्याने काम हाती घेण्यात यावे, असे भेडखळ येथील ग्रामस्थांचे म्हणणे आहे…