उरण शिवसत्ता टाइम्स (प्रविण पाटील) :-
उरणची राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट म्हणजे स्वर्गीय प्रशांतभाऊ एके प्रशांतभाऊ… ते सांगतील ते तोरण आणि तेच सांगतील तेच धोरण असे होते… मात्र अवघ्या तीन महिन्यांपूर्वी हृदयविकाराच्या झटक्याने प्रशांतभाऊ यांनी आयुष्याच्या रंगमंचावरून अचानक एक्झिट घेतल्याने उरण तालुका राष्ट्रवादीत जिल्ह्यातून नाहक ढवळाढवळ सुरू झाली आहे.राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाच्या वाढीसाठी नेहमीच प्रयत्नशील असलेल्या कार्यकर्त्यांची उचलबांगडी केली जात आहे… प्रशांतभाऊ यांच्या काळात ज्यांची उरण तालुका राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट अध्यक्षपदावर निवड झाली होती त्या मनोज भगत यांना तडकाफडकी पदावरून हटविण्यात आले आहे… त्यांच्या जागी प्रदीप तांडेल नामक एका कार्यकर्त्यांची ऐन निवडणुकीच्या तोंडावर निवड केली असल्याने सर्वसामान्य कार्यकर्त्यांमध्ये मात्र मोठी खदखद असल्याचे समोर आले आहे.
या निमित्ताने सामान्य कार्यकर्ते आत्ता थेट जिल्हाध्यक्ष सुरेश टोकरे हे कुणाच्या ताटाखालचे मांजर झाले आहेत का ?असा सवाल करू लागले आहेत. उरण तालुक्यातील कार्यकर्त्यांची कोणतीही बैठक नाही… कोणताही ठराव नाही… असे असताना मनोज भगत यांना खुर्च्चीवरून हटविण्याचे कारण काय ?असा सवाल या निमित्ताने राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांकडून विचारला जात आहे. उरण तालुक्यात ज्यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट कार्यरत आहे… त्या तालुका अध्यक्ष मनोजदादा भगत यांना तडकाफडकी तालुका अध्यक्ष पदावरून हटविण्यात आले असल्याने तालुक्यात राष्ट्रावादीच्या कार्यकर्त्यांमध्ये कमालीचा असंतोष पसरला आहे… या असंतोषाचा भडका उडून कार्यकर्ते वेगळा निर्णय घेण्याच्या तयारीत देखील आहेत.मात्र माजी तालुकाध्यक्ष मनोज भगत यांनीच कार्यकर्त्यांना थांबवून ठेवले आहे. ते लवकरच वरिष्ठांकडे आपली बाजू मांडून जिल्हाध्यक्ष कुणाच्या तरी सांगण्यावरून उरण तालुक्यात नाहक ढवळाढवळ करीत आहेत याचा पाढाच वाचणार आहेत… उरणच्या राष्ट्रवादीची शान असलेले भाऊ जाऊन अवघे तीन महिने होत नाहीत…तोच भाऊंच्या जीवावर मोठे झालेले लोक आणि मंडळी भाऊंच्या कट्टर समर्थकांचा राजकीय बळी घेत आहेत…राष्ट्रवादीच्या कट्टर समर्थकांना बाजूला सारून आपल्याला जे… जी हुजूर करतील अशांनाच पदांच्या खिरापती वाटण्यात येत आहेत … त्यामुळे पक्षातील ही मंडळी कटकारस्थाने करीत असतील तर निष्ठावंत कार्यकर्त्यांना वेगळा निर्णय घ्यावा लागेल असा इशारा या निमित्ताने देण्यात आला आहे…